अतिवृष्टीचा धोका सांगणारे दुसरे डॉप्लर रडार अंधेरीत

138

अतिवृष्टीचा धोका सांगणारे दुसरे डॉप्लर रडार लवकरच हवामान खाते अंधेरीत पालिकेच्या जागेत कार्यान्वित करणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसण्याआधीच घराबाहेर पडलेल्या नोकरदार आणि सर्वसामान्यांना सावध करता येणार आहे. पावसाळापूर्व कामांची माहिती देण्यासाठी विशेष वेब पेज, अतिवृष्टीत अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी निवारा केंद्रे आणि रेल्वे रुळांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. पालिका मुख्यालयात आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईतील आपत्कालीन व्यवस्थापनाचा यंत्रणांचा आढावा घेतला. या मॅरेथॉन बैठकीला पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह रेल्वे, बेस्ट, हवामान खाते आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत अतिवृष्टीचा फटका जीवनवाहिन्या समजल्या जाणाऱया रेल्वे, बेस्ट या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे नोकरदारांना आणि काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या सर्वसामान्यांना कार्यालयात, घरात पोहोचायला उशीर होतो. याबाबतची माहिती व आवश्यक मदत मुंबईकरांना तातडीने मिळावी यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह मध्य रेल्वे, पोलीस, बेस्ट, हवामान खाते यांची विशेष समन्वय बैठक महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सगळ्या यंत्रणांना आपापल्या जबाबदाऱया सुनियोजित पद्धतीने पार पाडता याव्या यासाठी किमान 24 तास आधी हवामान खात्याचा अंदाज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी हवामान खात्याने यंत्रणा आणखी अद्ययावत करावी, असे निर्देश पालिका आयुक्तांनी हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांना दिले.

  • सध्या कुलाबा येथे एक डॉप्लर रडार कार्यरत आहे. अंधेरीतील वेरावली येथे पावसाळ्यापूर्वी दुसरे डॉप्लर रडार कार्यान्वित होणार आहे.
  • अडकून पडलेल्या प्रवाशांना पालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाईल. त्यासाठी प्रवाशांकडून नाममात्र 5 रुपये भाडे घेतले जाईल.
  • पावसाळापूर्व तयारीसाठी विशेष ‘वेब पेज’ची निर्मिती केली जाणार आहे. त्यावर पावसाळ्याची कामे, सद्यस्थिती आणि संबंधित यंत्रणा याची माहिती असणार आहे.
  • रेल्वे विस्कळीत झाली तर बेस्टसारखी पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात येणार आहे.
  • अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करणाऱया स्वयंसेवी संस्थांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष व माहिती-तंत्रज्ञान संचालकांकडून अद्ययावत केली जात आहे.
  • पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी रेल्वे रुळांखालील पर्जन्य जलवाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत.
  • रेल्वे ट्रकखालील नाले, नालेसफाई, नाले रुंदीकरण यांसारख्या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला तातडीने निधी दिला जाणार आहे.
  • या सगळ्या कामांवर वेळोवेळी ड्रोन कॅमेऱयाची नजर ठेवली जाणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या