अंधेरीत इमारत बांधकाम कोसळून 5 जण जखमी, बांधकाम सुरू असताना दुर्घटना

अंधेरी (प.), जुहू गल्ली येथील एका चाळीच्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम कोसळून झालेल्या एकाच कुटुंबातील दुर्घटनेत पाच जण जखमी झाले. जखमींवर पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अंधेरी (प.) सलामी हॉटेल, अमर सोसायटी, मेहता बाबा चाळ येथे या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास इमारतीचे बांधकाम समोरील सहा घरांवर अचानक कोसळले. या दुर्घटनेत शेख कुटुंबातील पाच जण जखमी झाले, तर काहीजण थोडक्यात बचावले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी सहाय्यक आयुक्त, 4 फायर इंजिन, 1 रेस्क्यू व्हॅन, 6 अभियंते, 2 दुय्यम अभियंते, कनिष्ठ अभियंते आणि 75 कामगार यांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अकबर शेख (60), चांद शेख (34), अजरा शेख (18),आरिफ शेख (18) आणि शमशुद्दीन शेख (50) हे पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई शहर भागात दोन ठिकाणी, पश्चिम उपनगरात एका ठिकाणी तर पूर्व उपनगरात एका ठिकाणी अशा एकूण चार ठिकाणी घरे, इमारती, त्यांचे भाग पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या