एटीएसची धडक कारवाई; विकास दुबेचे दोन साथीदार ठाण्यात सापडले

कानपूरच्या बिकरू गावात आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हत्याकांड करून फरार झालेले कुख्यात गँगस्टर विकास दुबेचे दोन साथीदार ठाण्यात सापडले. पोलिसांना चकवा देत मुंबई, ठाण्यात लपण्यासाठी ते दोघे आले होते. पण महाराष्ट्र एटीएसप्रमुख देवेन भारती यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या दोघांच्या ठाण्यात मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे यूपी पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

तीन जुलैच्या मध्यरात्री गँगस्टर विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी बिकरू गावात अंधाधुंद गोळीबार करुन आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. तेव्हापासून यूपी पोलीस विकास दुबे आणि त्याच्या फरार साथीदारांचा देशभरात कसून शोध घेत होते. त्या सर्व गुन्हेगारांना पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी रोख रकमेचे बक्षीस देखील जाहीर केले होते. दरम्यान, त्या पोलीस हत्याकांडाचा मास्टरमाइंड विकास दुबे याला पकडण्यात यश आले पण तो पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. दुबेचा खात्मा झाल्यानंतर त्याचे साथीदार सैरावैरा झाले असून त्यापैकी दोघे मुंबई व ठाण्यात लपण्याचा प्रयत्न करीत असल्याची खबर एटीएसच्या जुहू युनिटचे प्रभारी निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार एटीएस प्रमुख देवेन भारती तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने, विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व एसीपी श्रीपाद काळे यांच्या देखरेखीखाली दया नायक, एपीआय दशरथ विटकर, सचिन पाटिल, सागर कुंजीर व पथकाने शिताफिने मागोवा घेत अरविंद उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (46) आणि त्याचा ड्रायव्हर सुशिलकुमार उर्फ सोनू तिवारी (30) या दोघांच्या ठाण्यातील कोलशेत रोड येथे मुसक्या आवळल्या. याबाबत यूपी एसटिएफला माहिती देण्यात आली आहे.

यूपीचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येतही सहभाग

सन 2011 साली युपीतल्या चौबेपूर पोलिस ठाण्यात तेव्हाचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची विकास दुबे याने हत्या केली होती. त्या हत्याकांडासह दुबे सोबत अनेक गुन्हे केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.

पोस्टर जारी झाले अन गुड्डन अडकत गेला

सहा तारखेला युपी पोलिसांनी फरार आरोपींचे पोस्टर जारी केले होते. त्याआधारे महाराष्ट्र एटीएसने सर्वत्र खबऱ्यांचे जाळे पसरवून सर्व बाजूने आरोपींचा श़ध सुरू केला. अखेर पोस्टरच्या आधारे गुड्डन आणि त्याच्या चालकाला पकडण्यात नायक व पथकाला यश आले.

मध्य प्रदेश, पुणे, मुंबई मग गाठले ठाणे

बिकरू गावात पोलिसांचे हत्याकांड घडवल्यानंतर गुड्डन आणि त्याचा ड्रायव्हर सुशीलकुमार यांनी दुसऱ्या दिवशी कारने तेथून पळ काढला आणि मध्यप्रदेशातील दातिया ठिकाण गाठले. तेथे कार सोडून दोघे ट्रकने पुण्याला आले. थोडा वेळ पुण्यात थांंबल्यानंतर दोघे दुसरा ट्रक पकडून मुंबईला आले. गुड्डनच्या गावचा तरुण ठाण्याच्या कोलशेत येथे पँकिंगचे काम करतो व त्याच परिसरात तो तरुण त्याच्या भावासोबत राहतो . गेल्या तीन ते चार दिवसांपासून गुड्डन आणि सुशील त्यांच्याकडे लपून राहत असल्याची खबर दया नायक यांना मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी सापळा रचून पथकाने दोघांना आज उचलले.

आपली प्रतिक्रिया द्या