शिवसेना सदैव बंजारा समाजाच्या सोबत

संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा घेऊन जातपात, धर्मपक्षभेद विसरून महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेल्या बंजारा समाजासाठी शिवसेना पक्ष सदैव आपल्या सोबत राहील, अशी ग्वाही आमदार सुनील राऊत यांनी नुकतीच कांजूर-भांडुप येथे पार पडलेल्या संत सेवालाल महाराजांच्या पालखी सोहळ्याला जमलेल्या हजारो भक्तगणांना दिली.

संत सेवालाल महाराजांची 282 वी जयंती कांजूर-भांडुप येथे नुकतीच वंजारा समाज सेवा संगमचे प्रमुख मार्गदर्शक व युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सुनील राऊत यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी संत सेवालाल महाराजांच्या भव्य प्रतिमेचे पूजन आमदार सुनील राऊत यांनी केले. याप्रसंगी आमदारांचा भव्य सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी आमदारांच्या कार्याला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी महिलांनी सामुदायिक गीतातून त्यांचे ऋण व्यक्त केले.

यावेळी बोलताना सुनील राऊत म्हणाले की, बंजारा समाज हा अतिशय प्रामाणिक व मेहनती असून राष्ट्रप्रेमी आहे. राज्य सरकारच्या वतीने इमारतीत पक्की घरे, वैयक्तिक विमा सरंक्षण व सध्या ज्या ठिकाणी राहत आहेत तेथे सर्व नागरी सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याबरोबरच पुढील वर्षी येणाऱया जयंतीपर्यंत सेवालाल महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याचे आश्वासन आमदार सुनील राऊत यांनी दिले.

या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नगरसेविका सुवर्णा करंजे, पीएसआय राठेड, सारिका पवार, शांतीलाल बोऱहाडे, मंगेश पवार, संतोष पाटील, अजय मिरेकर, अनंत पाताडे, बाबू ठाकूर, शालिराम पटेकर, मामा मंचेकर, शेखर जाधव, मनोज महाडिक, जीवन कांबळे, अरविंद नागनुरी, कांतीलाल बोऱहाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकरा तांडय़ांच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.

आपली प्रतिक्रिया द्या