
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा अवघ्या 7 धावांनी पराभव करत विजय हजारे करंडक स्पर्धेतील आपला पाचवा विजय मिळवला आणि स्पर्धेची बाद फेरी गाठली. तसेच विजयाचा षटकार ठोकणारे कर्नाटक, उत्तर प्रदेश यांनीही गटात अव्वल स्थान अबाधित राखत बाद फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे बिहार आणि पंजाबनेही बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
धुक्यामुळे विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात मुंबईने मुशीर खान (73) आणि श्रेयस अय्यर (82) यांच्या वेगवान खेळींच्या जोरावर 33 षटकांच्या सामन्यात 9 बाद 299 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती. हिमाचलनेही 300 धावांचा जोरदार पाठलाग केला. 5 बाद 139 अशा बिकट स्थितीत असताना मयंक डागर (64) आणि अमनप्रीत सिंग (42) यांनी सहाव्या विकेटसाठी 92 धावांची झुंजार भागी रचत सामन्यात जान आणली. तळाला अमित कुमारने फटकेबाजी करत सामना 6 चेंडूंत 12 धावा असा रंगवला होता. मात्र शिवम दुबेच्या शेवटच्या षटकात अमित कुमार व रोहित कुमार सलग चेंडूंवर बाद झाले आणि मुंबईने 7 धावांनी बाजी मारली. या विजयामुळे मुंबईने आपली बाद फेरी निश्चित केली असून पंजाबने गोव्याचा पराभव करत आपलेही स्थान पक्के केले आहे. तसेच कर्नाटकने राजस्थानचा 150 धावांनी पराभव करीत स्पर्धेतील आपला सलग सहावा विजय साजरा करत बाद फेरी गाठली.



























































