अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने इराणी करंडकावर आपले नाव कोरून तब्बल 27 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रणजी विजेता मुंबईला शेष हिंदुस्थानविरुद्धच्या या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपद बहाल करण्यात आले. पहिल्या डावात 222 धावांची नाबाद खेळी करणारा सरफराज खान या विजयाचा नायक ठरला.
सरफराज खानच्या नाबाद द्विशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 537 धावांचा डोंगर उभारला होता. अभिमन्यू ईश्वरनच्या 191 धावांच्या खेळीनंतरही शेष हिंदुस्थानला 416 धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात मिळालेली 121 धावांची आघाडी या जेतेपदासाठी निर्णायक ठरली.
मुंबईने 8 बाद 329 धावांवर दुसरा डाव घोषित केला. या डावात तनुष कोटियानने (नाबाद 114) शतकी खेळी केली, तर पृथ्वी शॉ (76) व मोहित अवस्थी (नाबाद 51) यांनी अर्धशतके झळकाविली. त्यानंतर उभय संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईने 1997 नंतर जिंकला इराणी करंडक
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबईने 1997 नंतर म्हणजेच तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इराणी करंडक जिंकला. या झळाळत्या करंडकावर मुंबईने 15 व्यांदा आपले नाव कोरले. याआधी, मुंबईने सय्यद मुश्ताक अली चषक अन् नंतर रणजी ट्रॉफीही जिंकलेली आहे. आता इराणी करंडक जिंकण्यातही या संघाला यश मिळाले हे विशेष.