
मुंबई महापालिकेचा वर्ष 2025-2026 चा अर्थसंकल्प सोमवार, 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पात मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्टसाठी ठोस उपाययोजनांसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अर्थसंकल्पात 8 ते 10 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता असून एपूण अर्थसंकल्प 65 हजार कोटींच्या पार जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जकात करातून मिळणारा महसूल बंद झाल्यामुळे महसूल वाढीसाठी महसुलांच्या नवीन पर्यायावरही भर दिला जाणार आहे. मात्र मुंबईकरांवर नवीन करांचा बोजा पडतो की आगामी पालिका निवडणुकीमुळे हा कर बोजा पुढे ढकलला जाणार आहे, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्ष 2025-2026 चा अर्थसंकल्प सोमवार, 3 फेब्रुवारीला पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी स्थायी समितीला सादर करणार आहेत. आयुक्त आणि प्रशासक म्हणून गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेचा 59 हजार 954 कोटी 75 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र त्यात वाढ होऊन या वर्षी तो 65 हजार कोटींच्या पार होण्याची शक्यता आहे.
– प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण, कोस्टल रोड-लिंक रोड ते दहिसर ते मीरा-भाईंदर, विकासकामे, सोयीसुविधा यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
– मुंबईकरांना माफक दरात आरोग्य, शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिका कोरोना काळातील अनुभव पाहता या वर्षीही शिक्षण आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.
– पालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात काय गोष्टींचा समावेश करावा व काय करू नये, यासाठी 2 हजार 703 मुंबईकरांनी पालिकेला विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत. यात बेस्ट उपक्रमाच्या बळकटीसंदर्भात सर्वाधिक 2 हजार 48 सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबईकरांवर नवीन कर लादू नका!
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता मुंबई महापालिकेच्या 2025-2026 वर्षाच्या अर्थसंकल्पात पुठल्याही नवीन कराचा बोजा करदात्या मुंबईकरांवर लादू नका, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा 2025-2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सादर करणार आहेत. महापालिकेचा महसूल कमी झाल्यामुळे तो वाढवण्यासाठी मुंबईकरांवर नवीन करांचा बोजा लादण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मुंबईकरांवर यंदाच्या अर्थसंकल्पात वाढीव कराचा बोजा न लादता त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.