मुंबईत आज लेडीज स्पेशल लसीकरण, महिलांचा टक्का वाढण्यासाठी विशेष सत्र

मुंबईतील पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने उद्या, शुक्रवार, 17 सप्टेंबरला पहिल्यांदाच केवळ महिलांचे थेट लसीकरण करण्यात येणार आहे. यावेळी महिलांना पहिला आणि दुसरा डोसही घेता येणार आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या 321 लसीकरण केंद्रांवर हे विशेष सत्र ठेवण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन लस नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसींचा तुटवडा असतानाही मुंबई महापालिकेने लसीकरणात आघाडी घेतली असून आतापर्यंत 75 लाख 79 हजार 824 जणांनी पहिला डोस तर 32 लाख 53 हजार 824 जणांनी दुसरा डोस घेतला असून एकूण 1 कोटी 8 लाख 33 हजार 648 डोस देण्यात आले आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, ते वाढावे, यासाठी महिलांच्या लसीकरणासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबईत दुसरा डोस घेणाऱयांचे प्रमाण कमी असल्याने ते वाढवण्यासाठी पालिकेने केवळ दुसरा डोस घेणाऱयांसाठी आतापर्यंत दोन विशेष सत्राचे आयोजन केले होते. महिला घरातल्या कामात व्यस्त असल्यामुळे किंवा केंद्रांवर गर्दी असल्याने लस घ्यायला जात नाहीत. त्यामुळे त्यांचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी हे विशेष महिला स्पेशल सत्र आयोजित करण्यात आले आहे. या पुढेही वेगवेगळ्या वयोगटांसाठी की, जिथे लसीकरण कमी झाले आहे, असे वाटते त्यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

  • मुंबईत महिलांचे लसीकरणाचे प्रमाण 43 टक्के आहे तर पुरुषांचे प्रमाण हे 56.91 टक्के आहे. त्यामुळे महिलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
  • महाराष्ट्रात गरोदर महिलांची संख्या 20 लाख आहे. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ 40 हजार 700 महिलांचे म्हणजे केवळ 2 टक्के गरोदर महिलांचे लसीकरण झाले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या