पालिकेची नालेसफाई, रस्ते-पूलबांधणी जोरा! १० टक्के नालेसफाई, 405 रस्त्यांची 50 टक्के कामे पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत असतानादेखील पावसाळापूर्व कामेही वेगाने करीत आहे. यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच दहा टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून 405 रस्त्यांची 50 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय महत्त्वाच्या 29 पुलांचे कामही प्रगतीपथावर आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका अधिकार्‍यांसह आज नालेसफाई, रस्ते आणि पुलांच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे पावसाळापूर्व कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रस्ते, पूल आणि नालेसफाईची कामे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ही कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील 336 पाणी तुंबणार्‍या ठिकाणांपैकी 223 ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. तर आणखी 24 ठिकाणे पावसाळ्याआधी पूरमुक्त होणार आहेत. याशिवाय 14 ठिकाणी पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव असला तरी पावसाळा तोंडावर आल्यामुळे इतर कोणत्याही कामांपेक्षा पावसाळापूर्व कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर वांद्रे कलानगरसह अनेक ठिकाणची नालेसफाई आणि रस्ते-पुलांच्या कामांची पाहणी करून आवश्यक सुचना देण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलू रासू, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायंगणकर, मुख्य अभियंता संजय दराडे, पर्जन्य जल वाहिन्या प्रमुख अभियंता संजय जाधव आदी उपस्थित होते.

असे होतेय नालेसफाईचे काम

– पालिकेच्या क्षेत्रात शहर 27, पूर्व उपनगरात 111 आाि पश्चिम उपनगरात मिळून 280 नाले आहेत. यांची एकूण लांबी 263.94 किमी आहे. यामधील दरवर्षी काढल्या जाणार्‍या 253846 मेट्रिक टनांपैकी आतापर्यंत 12799 म्हणजेच सुमारे 11 टक्के गाळ काढण्यात आला आहे.

– मुंबईतील महत्त्वाची असलेल्या मीठी नदीचा शहरात 6.255 किमी, पूर्व उपनगरात 13.030 किमी आणि पश्चिम उपनगरात 2.220 मिळून 21.505 किमीची लांबी आहे. या नदीत दरवर्षी काढण्यात येणार्‍या 97181 मेट्रिक टन गाळापैकी आतापर्यंत 5 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.