‘बेस्ट’ला पालिकेची पंधराशे कोटींची मदत! शिवसेनेच्या पाठपुराव्यातून आर्थिक सहाय्य

845

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिकेकडून ‘बेस्ट’ला मोठी आर्थिक मदत करण्यात येत आहे. यावर्षी पंधराशे कोटींची मदत करण्यात येणार असून एप्रिलच्या पहिल्या हफ्त्याचे 125 कोटी पालिकेने ‘बेस्ट’ला दिले आहेत. पालिकेच्या या आर्थिक सहाय्यामुळे ‘बेस्ट’ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबईत लोकलनंतर दुसर्‍या क्रमांकाची जीवनवाहिनी असणार्‍या ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या वर्षी ‘बेस्ट’ला 2126.31 कोटींची मदत करण्यात आली आहे. यानुसार या वर्षीही मदत करण्यासाठी अर्थसंकल्प 2020-21 मध्ये 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रतिमहिना 125 कोटी याप्रमाणे ही मदत देण्यात येत आहे. दरम्यान, सन 2020-21 चे अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समितीने मंजूर करून ते महानगरपालिकेकडे अंतिम स्विकृतीकरिता सादर केलेले आहेत. मात्र महानगरपालिकेने ते पूर्णत: स्विकृत केलेले नाहीत. तरीदेखील कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे स्थायी समितीची मंजुरी घेणेही शक्य नाही. मात्र ‘बेस्ट’ची निकड लक्षात घेता आणि लोकल बंद असल्यामुळे ‘बेस्ट’च्या सेवेत कोणताही खंड पडू नये, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची प्रवासाची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल महिन्याच्या मदतीचे 125 कोटी बेस्टला देण्यात आले आहेत. याबाबतचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

‘बेस्ट’ची कार्यक्षमता वाढणार

पालिकेने ‘बेस्ट’ला आर्थिक मदत देताना नवीन बस घेणे, वेतन करारात येणारे आर्थिक दायित्व आणि दैनंदिक खर्चासाठी वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. याशिवाय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, गाड्यांचा प्रति किमी खर्च कमी करणे, भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांचे प्रभावी व्यवस्थापन करणे, उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करणे आणि महानगरपालिकेने सुचवलेल्या वसुलीची खात्री करून वसुली करणे आवश्यक असल्याचे अनिवार्य केल आहे. पालिकेच्या या अटींमुळे ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारून कार्यक्षमता वाढणार आहे.

‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिकेकडून एकूण पंधराशे कोटींची मदत करण्यात येणार आहे. या मदतीबरोबरच उत्पन्नवाढ आणि सक्षमतेसाठी केल्या जाणार्‍या मदतीमुळे ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी ‘बेस्ट’ची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ही मदत देण्यात येत आहे. – यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

आपली प्रतिक्रिया द्या