कुष्ठपीडित दिव्यांगांना पालिकेकडून आता दरमहा 2500 आर्थिक सहाय्य!

मुंबई महानगरपालिकेच्या कुष्ठपीडित अपंग व्यक्तींच्या अर्थसहाय्य योजनेतून कुष्ठपीडित दिव्यांगांना दरमहा 2500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत देण्यात येणाऱया दरमहा एक हजाराच्या मदतीत दीड हजारांची वाढ करण्यासाठी स्थायी समितीत प्रशासनाने मंजुरीसाठी प्रस्ताव मांडला आहे.

मुंबईत महानगरपालिकेच्या माध्यमातून कुष्ठपीडितांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने दरमहा ही मदत केली जाते. 2014 पासून ही मदत करण्यात येत आहे. पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुष्ठरोगामुळे 40 टक्क्यांपेक्षा जास्त कार्यात्मक दिव्यांग असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार कुष्ठपीडित दिव्यांग व्यक्तीचे मुंबई महानगरपालिका परिसरात वास्तव्य असणे आवश्यक राहील. त्याकरिता पुराव्यासाठी रेशनकार्ड/मतदान ओळखपत्र, फोटोपास/घरपट्टी पावती, लाइट बिल व आधारकार्ड आदींचा साक्षांकित पुरावा जोडावा लागेल. अर्ज करण्याच्या तारखेस अर्जदाराने 18 वर्षे वय पूर्ण केलेले असावे. तसेच कुष्ठरोगामुळे 40 टक्के दिव्यांगत्वाबाबतचे सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्थसहाय्य मिळणाऱया लाभधारकास दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय, वडाळा येथे जमा करणे आवश्यक राहील.

400 लाभार्थ्यांना होणार फायदा

मुंबईत पात्र लाभार्थ्यांना इतर महानगपालिकांकडून मिळणाऱया अनुदानाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेकडूनही दरमहा एक हजाराचे अनुदान 2500 इतके करावे यासाठी पालिकेने स्थायी समितीत प्रस्ताव मांडला आहे. सद्यस्थितीत या योजनेचा लाभ 350 लाभार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये अंदाजित 50 लाभार्थ्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्प 2020-21 मध्ये 70 लाखांची तरतूद करण्यात आली असून वाढीव तरतूद प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या