पावसाळ्यासाठी पालिका सज्ज; रस्ते-पूल, पर्जन्य जलवाहिन्यांची 507 कामे पूर्ण

1769

कोरोनाविरोधात अहोरात्र झटणार्‍या पालिकेची पावसाळापूर्व कामेही अंतिम टप्प्यात आल्यामुळे पालिका आता पावसाळ्यासाठी तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये रस्ते-पूल, पर्जन्य जलवाहिन्यांच्या एकूण 732 कामांपैकी तब्बल 507 कामे पूर्ण झाली असून 225 कामे अंतिम टप्प्यात आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेऊन शिल्लक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह रस्ते वाहतूक प्रमुख अभियंता संजय दराडे, पर्जन्य जलवाहिन्या प्रमुख अभियंता संजय जाधव यांच्यासह संबंधित पालिका अधिकार्‍यांसह मुंबईत पावसाळापूर्व कामांची पाहणी केली. नालेसफाईसह रस्ते कामे पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत आणि रस्त्यांची पावसाळ्यानंतर डेडलाइन असणारी कामे ‘सेफ स्टेज’मध्ये आणून ठेवावीत जेणेकरून मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. नालेसफाईचे काम 90 टक्क्यांहून जास्त पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्व हे काम पूर्ण होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

असे होतेय काम

  • मुंबईतील रस्त्याच्या एकूण 609 कामांपैकी 442 कामे पूर्ण झाली आहेत. तर 167 कामे अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये पावसाळ्याआधी 29 कामे पूर्ण होणार असून 138 कामे ‘सेफ स्टेज’मध्ये आणून ठेवली जाणार आहेत. कोरोनाच्या प्रभावामुळे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या 12 ठिकाणच्या कामांना मात्र फटका बसला आहे.
  • मुंबईभरात सुरू करण्यात आलेल्या पुलांच्या 32 कामांपैकी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ‘सेफ स्टेज’मध्ये आणून ठेवली गेली आहेत. तर पर्जन्य जलवाहिन्यांच्या 91 कामांपैकी 65 कामे पूर्ण झाली असून 26 कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर 4 कामे ‘सेफ स्टेज’मध्ये आणली जाणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या