
मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा शुक्रवारी सकाळी ठप्प झाली. वांगणी ते शेलू दरम्यान मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. ऐन गर्दीच्या वेळी कर्जत ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास वांगणी-शेलू दरम्यान मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाला. त्यामुळे मालगाडी ट्रॅकवरच थांबली. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयात वेळेते पोहोचायला चाकरमान्यांना उशीर होत असून त्यांना लेटमार्क लागत आहे.
ताज्या माहितीनुसार, सीएसएमटीकडून कल्याणकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीकडून पनवेलकडे धावणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. अचानक वाहतूक विस्कळीत झाल्याने बऱ्याच लोकल दोन स्थानकांमध्ये उभ्या राहिल्या होत्या. या काळात कामावर निघालेल्या नागरिकांनी ट्रॅकवर चालत जाऊन इच्छित ठिकाण गाठले. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या त्रासामुळे प्रवाशांनी संपात व्यक्त केला.
 
             
		




































 
     
    




















