सिव्हिल इंजिनीयरिंगच्या परीक्षेत घोळ

524

सिव्हिल इंजिनीयरिंगच्या तृतीय सत्राच्या Suedrveying – 1 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मुंबई विद्यापीठाने घोळ घातल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण सहा प्रश्न अपेक्षित असताना विद्यापीठाने केवळ पाचच प्रश्न विचारले असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 नंतर प्रश्न क्रमांक 5 विचारण्यात आला असून चौथा प्रश्नच गायब आहे.

18 नोव्हेंबरला सिव्हिल इंजिनीयरिंगचा Suedrveying – 1 या विषयाची परीक्षा होती. परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांच्याकडे चौथा प्रश्नच विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेत छापला नसल्याची तक्रार केली. पर्यायी प्रश्नांमध्ये एक पर्याय कमी असल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनःस्ताप झाला असून याचा परिणाम त्यांच्या गुणांमध्ये होणार आहे. याविषयी शीतल देवरुखकर-शेठ यांच्यासह युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व्यवस्थापन परिषदेत या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळवून देण्याची मागणी करणार आहेत.

गेल्या वर्षीदेखील विद्यापीठाकडून अशाच चुका झाल्या होत्या त्यावेळेसही व्यवस्थापन परिषदेत युवासेनेने विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा विषय लावून धरला होता. वारंवार होणाऱया या चुका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने विद्यापीठाला करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रदीप सावंत यांनी स्पष्ट केले.

या परीक्षेत एकूण 6 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 1 (compuledsaryed question) पूर्ण सोडविणे सक्तीचे होते. इतर पाच प्रश्नांपैकी कोणतेही तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची होती.

 मात्र प्रश्नपत्रिकेत एकूण पाचच प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 1 सोडविल्यानंतर उर्वरित चार प्रश्नांपैकीच तीन प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना लिहावी लागली.

 प्रश्न क्रमांक 4 छापलाच नसल्याने पर्यायी प्रश्नांमध्ये एक प्रश्न कमी होता. याचा परिणाम गुणांवर होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या