उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या आमदारांना मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आपण एकत्र आलो आहोत. हिंदुत्वाच्या विचारांची ही एकजूट मजबूत ठेवून जनतेचे प्रश्न सोडवूया. शिवसेना-भाजप एकत्र आल्याने विरोधकांचे अवसान गळाले आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भगवा झेंडाच फडकणार आहे. त्यासाठी एकजुटीने आणि एकदिलाने निवडणुकीच्या कामाला लागा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या आमदारांना केले.

शिवसेना-भाजप आमदारांची संयुक्त बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, गेली 25 वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. ही युती घडविण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सत्ता मिळाली. मात्र काही गैरसमज आणि मतभेदांमुळे आपण दुरावलो, तरीही आपल्यातील हिंदुत्वाचा धागा कायम होता. आपले मन आणि विचार भगवे आहेत. हाच हिंदुत्वाचा धागा घेऊन आपण एकत्र आलो आहोत. याच एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागा.

सरकारच्या योजना जनतेपर्यत पोहचवा -मुख्यमंत्री

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. आचारसंहिता कधीही लागू होईल. तेव्हा जनतेच्या कामाचे प्रस्ताव असतील ते तातडीने मंजूर करून घ्या. आपण एकत्र आलो आहोत आता ताकदीने एकत्र उभे राहू. नेतृत्न सांगेल त्यानुसार शांतपणे पुढे गेलो तर लोकसभा आणि विधानसभेत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षणाचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न सोडवू. त्यासाठी आदिवासी समाजाच्या आमदाराशीही चर्चा करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सामाजिक-राजकीयदृष्टय़ा ऍलर्ट राहा!

विरोधकांसाठी ही ‘करो या मरो’ची स्थिती आहे. त्यांच्या हातून निवडणूक सटकत चालली आहे. ते कोणतेही हत्यार वापरतील. जातीयवादी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होईल, त्यासाठी सामजिक आणि राजकीयदृष्टय़ा ऍलर्ट राहा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, दादा भुसे, प्रतोद आमदार डॉ. नीलम गोऱहे, आमदार सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

जनतेला विश्वास; मत वाया जाणार नाही

युती झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पण अनेक लोकांची प्रत्यक्षात मते जाणून घेतली तेव्हा अनेकांना युती झाल्यामुळे आनंद झाला असल्याचे समोर आले आहे. आता आमचे मत वाया जाणार नाही असा विश्वास लोकांमधून व्यक्त होत असल्याचे युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.