मुंबईतील अनधिकृत होर्डिंग तीन दिवसांत हटणार, आयुक्तांचे विभागीय अधिकाऱयांना निर्देश

मुंबईत मोठय़ा प्रमाणात लावलेल्या अनधिकृत राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक होर्डिंगमुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधा येत असून त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईच्या सौंदर्याला बाधा आणणाऱया अनधिकृत, विनापरवाना होर्डिंगवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अरविंद नेरकर यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेऊन केली होती. त्यावर आयुक्तांना अनधिकृत होर्डिंग तीन दिवसांत हटवावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईतील चौक, वाहतूक बेटे, रस्ते दुभाजक, विजेचे खांब यावर अनधिकृतपणे होर्डिंग लावल्यामुळे मुंबईतील अनेक परिसरांना बकाल स्वरूप आले आहे. मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराचे सौंदर्य कायम राहावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले होते, मात्र तरीही अनेक सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक वापराचे हार्ंडग सर्रासपणे लावली गेली आहेत. अशांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने कायद्यात बदल करून कठोर नियम बनवा आणि असे होर्डिंग लावणाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही माजी आमदार अरविंद नेरकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.