अदानीच्या महाघोटाळय़ाची ईडी चौकशी का करत नाही? मुंबई काँग्रेसचा ईडीच्या कार्यालयावर धडक मोर्चा

‘ईडी सेबी भाई भाई अदानी लुटतोय देशाची कमाई’, ‘सेबीने दिली सूट अदानी करतोय लूट आणि ईडी बसलाय चूप’, ‘सरकार चालवते दुकान त्यावर ईडी मेहरबान… अदानी सेबी पेहलवान’, ‘देशाला लुटणाऱया सेबी आणि अदानीचा धिक्कार असो’ अशी तुफान घोषणाबाजी करत मुंबई कॉँग्रेसने ईडी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळय़ाचा फुगा फुटला आहे. यानंतरही ईडी अदानी कंपनीच्या महाघोटाळय़ाची चौकशी का करत नाही याचे उत्तर द्या, अशी मागणी कॉँग्रेसने केली.

केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात ‘लाडका उद्योगपती’ योजना सुरू असून सरकारच्या आशीर्वादाने अदानी पंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे. मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतरही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारी ईडी अदानी पंपनीच्या घोटाळय़ाकडे मात्र डोळे बंद करून पाहत आहे. अदानीच्या महाघोटाळय़ाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफिसवर मोर्चा काढला. हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, पण कार्यकर्ते हटले नाहीत. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या मोर्चात माजी मंत्री अस्लम शेख, माजी खासदार हुसैन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, गणेश यादव, प्रेनिल नायर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते?

अदानी घोटाळय़ाची चौकशी करण्याची जबाबदारी सेबी देण्यात आली होती. पण सेबीच्या प्रमुख माधवी बुच याच या घोटाळय़ातील लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अदानी कंपंनीतील महाघोटाळय़ाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण कें द्रातील भाजप सरकार जेपीसी चौकशी करत नाही. अदानी घोटाळा सेबी व देशाच्या पंतप्रधानांभोवती फिरत असताना चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. केंद्रातील सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला