Lok Sabha 2019 आम्ही धार्मिक, पण भाजपला मते द्यायला मूर्ख नाही!

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘आम्ही धार्मिक असू पण भाजपला मते द्यायला मूर्ख नाही’ अशी वादग्रस्त पोस्ट सोमवारी ‘आयआयटी’ मुंबईच्या शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या (एसजेएमएसओएम) ट्विटर अकाऊंटवर आल्याने खळबळ उडाली होती. आयआयटीसारख्या संस्थेच्या ट्विटर अकाऊंटवर अशी राजकीय पोस्ट टाकल्याबद्दल अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आयआयटी मुंबईने त्याची गंभीर दखल घेतल्यानंतर हे अकाऊंट ट्विटरवरून गायब झाले.

सोमवारी दुपारी ही पोस्ट ‘एसजेएमएसओएम, आयआयटी बॉम्बे’ या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट झाली. ‘हिंदुइझम’ आणि हिंदुत्व समान नाहीत. धार्मिक असणे आणि मूर्ख असणे यासुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथले लोक धार्मिक असू शकतात पण भाजपला मत देण्याइतके मूर्ख नाहीत’ अशा स्वरूपाची ती पोस्ट होती. ती पोस्ट वाचताच ट्विटरवरील अनेकांनी त्याचा निषेध केला. तसेच ही आयआयटी मुंबईची अधिकृत भूमिका आहे का अशीही विचारणा केली.
आयआयटी मुंबईच्या व्यवस्थापनाला यासंदर्भात समजताच त्यांनी त्याची तातडीने दखल घेत आयआयटी ही राजकीय संस्था नसल्याचे स्पष्ट केले.याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने ‘एसजेएमएसओएम, आयआयटी बॉम्बे’ हे ट्विटर अकाऊंटच ट्विटरवरून गायब झाले.

आपली प्रतिक्रिया द्या