सर्वांसाठी लोकल 15 डिसेंबरनंतरच, महापालिका आयुक्त चहल यांचे स्पष्टीकरण

मुंबईत सध्या कोरोना रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आहे. हजारो बेड रिक्त आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थानसारख्या राज्यात पुन्हा होणारी रुग्णवाढ पाहता आपल्यालाही खबरदारी घेणे आणि सावध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय 15 डिसेंबरची स्थिती पाहूनच घेता येईल अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत दिवाळीनंतर वाढलेल्या चाचण्या आणि सणाच्या कालावधीत वाढलेली गर्दी-गाठीभेटींमुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील आणखी दोन ते तीन आठवडे मुंबईसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत कितपत वाढ होते यावर पालिकेकडून लक्ष ठेवले जाणार आहे. दिवाळीसाठी गावी गेलेल किंवा सुट्टय़ांसाठी बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता पुन्हा शहरात परतत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे पुढील आठवडय़ातील आकडे कसे असतील याकडे लक्ष ठेवावे लागेल. यावर मुंबई लोकल सुरू करण्याचा निणऱय अवलंबून असेल. पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आहे. हीच स्थिती 15 डिसेंबरपर्यंत राहिली, तर त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय घेता येईल, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

सक्रिय रुग्ण पहिल्यांदाच दहा हजारांपेक्षा कमी

  • मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढत गेले. यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एका वेळी 40 हजारांपेक्षा जास्त झाली होती. मात्र सद्यस्थितीत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदाच 9600 पर्यंत खाली आल्यामुळे मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे.
  • विशेष म्हणजे या सक्रिय रुग्णांमधील सुमारे पाच हजार रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत तर चार हजारांना सौम्य लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तर सुमारे 700 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे असून त्यांच्यावरही आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई कडक

पालिकेच्या उपाययोजना आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोरोना रोखण्यात यश येत आहे. असे असले तरी अजूनही अनेक नागरिक मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये मास्क न वापरणाऱयांविरोधात कारवाई कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज एक हजार म्हणजेच प्रतिदिन संपूर्ण मुंबईत 24 हजार जणांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या