विळखा सुटला! कोरोना केअर सेंटरमधील 67 हजार बेड रिक्त

2218

मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या 403 ‘कोरोना केअर सेंटर’मधील एकूण 73 हजार खाटांपैकी तब्बल 67 हजार 574 खाटा रिक्त आहेत. त्यामुळे हॉटेल, शाळा, इमारतींमध्ये सुरू केलेली अनेक ठिकाणची कोरोना आरोग्य केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत. मात्र बीकेसी, गोरेगाव नेस्को, ‘एनएससीआय’ वरळी, महालक्ष्मी, दहिसर, मुलुंड येथील जम्बो कोरोना हेल्थ सेंटर मात्र सुरूच राहणार आहेत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामामुळे 10 ऑगस्टपर्यंत सुमारे 98 हजार रुग्ण कोरानामुक्त होऊन घरी परतले असून फक्त 19 हजार 190 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 80 टक्क्ॊयांहून जास्त रुग्णांच्या प्रकृतीमध्येही चांगली सुधारणा आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर गेल्यामुळे पालिकेने उपलब्ध केलेले कोरोना केअर सेंटरमधील बेड आता मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे ही आरोग्य केंद्रे बंद करून प्रभागात दोन ते चार केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. रुग्ण संख्या वाढल्यास बंद केलेली आरोग्य केंद्रे तातडीने सुरू करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले. या ठिकाणच्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, डॉक्टर्स-नर्स, मनुष्यबळ सुविधा पालिकेला आपल्या आरोग्य सुविधेसाठी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत 10 ऑगस्टपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,24,322 झाली असून 6,842 जणांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे स्थिती

लक्षणे नसलेले आणि रुग्णाच्या क्लोज कॉण्टॅक्टमधील संशयितांसाठी सुरू केलेल्या ‘कोरोना केअर सेंटर-1’ची संख्या 300 असून याची क्षमता 50 हजार बेडची आहे. मात्र यातील फक्त 4 हजार बेडवर संशयित रुग्ण आहेत. त्यामुळे या ठिकाणी तब्बल 46 हजार बेड रिक्त आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आणि लक्षणे असलेल्या रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोरोना केअर सेंटर-2’ची संख्या 73 असून याची क्षमता 23 हजार बेडची आहे. यातील 1424 खाटांवर रुग्ण असल्यामुळे या ठिकाणीही 21 हजार 576 खाटा रिक्त आहेत.

मुंबईबाहेरील कर्मचाऱयांनाही परत पाठवले

मुंबईत कोरोनाचा प्रभाव जास्त असताना केरळ, वर्धा, आंबेजोगाई येथील काही आरोग्य कर्मचारी आणण्यात आले होते. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे बाहेरून आणलेल्या सर्व कर्मचाऱयांना परत पाठवण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात पालिकेच्या अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व कर्मचाऱयांची अँटिजेन टेस्ट करून आवश्यक उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोविडसंबंधित कर्मचाऱयांना 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात आल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या