सर्वसामान्यांनाही प्लाझ्मा उपलब्ध होणार! शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

कोरोना रुग्णांवर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसाठी आता केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात सर्वसामान्यांना प्लाझ्मा उपलब्ध होणार आहे. या आधी प्लाझ्मा कोणालाही थेट उपलब्ध होत नव्हते. मात्र, आता पालिका रुग्णालयांत रक्ताप्रमाणे सशुल्क प्लाझ्मा उपलब्ध होणार आहे. पण, त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. शिवसेनेने सर्वसामान्यांना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. पालिकेच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्लाझ्मा दान मोहिमेचे आयोजन केले होते. याला पालिकेची शिबिरे तसेच अनेक स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून हे प्लाझ्मा गोळा करण्यात आले. त्याचे संकलनही या तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आले.

प्लाझ्मादानमधील फरक

एखाद्या व्यक्तीने प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याला आपला जवळचा नातेवाईक किंवा इतर कोणाला रुग्णालयांकडून प्लाझ्मा मिळवून द्यायचा असेल तर तशी कायद्यात तरतूद नव्हती. रक्तदान शिबिरात जसे रक्त गोळा केल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात जाऊन कार्ड दाखवून त्याचे किंवा इतर कोणाचे रक्त विकत घेता येते, तशी तरतूद प्लाझ्मा दान करण्याच्या पद्धतीत नव्हती. दान केलेला प्लाझ्मा फक्त त्याच रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरता येत होता. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्लाझ्मा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अनेक जण प्लाझ्मा दान करण्याबाबत कचरू लागले होते.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्लाझ्मा दान ही नवीन संकल्पना पुढे आली. या संकल्पनेत आतापर्यंत दान केलेले प्लाझ्मा सर्वसामान्यांना उपलब्ध होत नव्हते. कायद्यात तशी तरतूद नव्हती. मात्र, आता पालिकेने याबाबत निर्णय घेऊन दान केलेला प्लाझ्मा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. प्लाझ्मा गोळा करण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढे म्हणजे 7 हजार रुपये देऊन कोणालाही प्लाझ्मा विकत घेता येणार आहे.’ – डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

शिवसेनेने घेतला पुढाकार

आम्ही प्लाझ्मा दान करतो, पण आम्ही दान केलेल्या प्लाझ्माचा आमच्या परिवार, मित्र किंवा नातेवाईकांसाठी उपयोग होत नसेल तर आम्ही प्लाझ्मादान का करायचे, असा प्रश्न कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती विचारू लागल्या. सर्वसामान्यांचा हा मुद्दा शिवसेनेचे शिवडीचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी लावून धरला. त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. याची दखल घेत पालिकेने नियमात बदल केला असून केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात जमा करण्यात आलेले प्लाझ्मा सशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा प्लाझ्मा सगळ्यांनाच उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या