मुंबईत 1109 नवे कोरोना रुग्ण; 49 जणांचा मृत्यू

495

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1109 नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 41 हजार 986 झाली असून मृतांचा आकडा 1368 वर पोहोचला आहे. मात्र एकाच दिवसांत 226 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा 17 हजार 213 वर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत 23 हजार 405 अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत मृत झालेल्या 49 रुग्णांमध्ये 34 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. यातील 20 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त, 20 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मृतांमधील 42 जणांना काही दीर्घकालीन आजार होते अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणारे 70 वर्षांहून जास्त वयाचे रुग्णही कोरोनामुक्त होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 72, 70 व 76 वर्षांच्या रुग्णांना उच्च रक्तदाब हा आजारही होता. शिवाय त्यांना श्वसनाचाही त्रास होता. त्यांना अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड, ऑक्सिजन आणि इतर सहायक उपचार केल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. याशिवाय मधुमेह आणि फुप्फुस खराब झालेल्या रुग्णावर इंजेक्शन टॉसिलिझुमॅब आणि इतर सहाय्यक उपचार केल्यामुळे 52 वर्षीय रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची पालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या