कोरोना विषाणू : 93 जणांना रुग्णालयातून घरी सोडले – आरोग्यमंत्री

442

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत आलेल्या 458 विमानांमधील 55 हजार 785 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 95 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर केली जात आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 312 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 228 प्रवाशांचा 14 दिवसांसाठीचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 98 जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 95 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर तिघांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या 98 प्रवाशांपैकी 93 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 3 जण पुणे येथे तर दोघे मुंबईत भरती आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या