
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी आज सोमवारी जाहीर केला. त्यानुसार एमसीए पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या 5 पदाधिकारी आणि ऍपेक्स काऊन्सीलच्या 9 सदस्यांची निवड 20 ऑक्टोबरला होणाऱया मतदानातून केली जाणार आहे. शिवाय मुंबई टी-20 लीगच्या 2 गव्हार्ंनग कौन्सील सदस्यांचीही निवड या निवडणुकीत होणार आहे. हे मतदान चर्चगेटच्या वानखेडे स्टेडियममधील एमसीए लाऊंजवर 20 ऑक्टोबरला होईल आणि निवडणुकीनंतर लगेच मतमोजणी होऊन एमसीएच्या नव्या पदाधिकाऱयांची निवड जाहीर केली जाणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) विद्यमान कार्यकारिणीची मुदत 3 ऑक्टोबर 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मी एमसीए निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करीत आहे, असे या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी एमसीए सचिव संजय नाईक यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. एमसीएची घटना आणि विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत ही निवडणूक मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात पार पाडली जाईल असे आश्वासनही मुख्य निवडणूक अधिकारी सहारिया यांनी एमसीएच्या सर्व सदस्यांना दिले आहे. या निवडणुकीत एमसीएशी संलग्न सर्व क्लबचे नियुक्त प्रतिनिधी आणि मुंबईतील नोंदणीकृत महिला व पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मतदान करू शकणार आहेत.
एमसीए निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे
n 27 सप्टेंबर 22 ते 3 ऑक्टोबर 2022 ः एमसीएशी संलग्न क्लब आणि मुंबईच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडून उमेदवारी जाहीर करणे (सकाळी 11 ते सायंकाळी 5 ) शनिवार, रविवारीही
4 ऑक्टोबर 2022 (सकाळी 11 वाजता) ः संलग्न क्लबचे नियुक्त सदस्य आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या नावाची अंतिम यादी जाहीर होणार निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम
6 ऑक्टोबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 ः एमसीएचे 5 पदाधिकारी, 9 ऍपेक्स कौन्सील सदस्य आणि मुंबई टी-20 कौन्सीलसाठी 2 सदस्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारणे
11 ऑक्टोबर 2022 (सकाळी 11पासून) ः उमेदवारी अर्जाची छानना (उमेदवार आणि शिफारसकर्त्यांची उपस्थिती आवश्यक)
11 ऑक्टोबर 2022 ः उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाल्यावर वैध उमेदवारांची यादी जाहीर
14 ऑक्टोबर 2022 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) ः इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी मागे घेऊ शकतील
14 ऑक्टोबर 2022 ः उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार.
20 ऑक्टोबर 2022 (दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत) ः 5 एमसीए पदाधिकारी, 9 ऍपेक्स कौन्सील मेंबर आणि 2 मुंबई टी-20 कौन्सील सदस्यांच्या निवडीसाठी मतदान
20 ऑक्टोबर 2022 ः मतदान संपल्यावर लगेच मतदानस्थळीच मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होणार