
कोरोनाचा फटका मुंबई क्रिकेटला बसलाय, पण आता या मोसमात क्रिकेटचा धमाका पाहायला मिळणार आहे. येत्या 9 ऑक्टोबरपासून मुंबईतील क्रिकेट मोसमाला सुरुवात होणार असून तालीम शिल्डने याचा श्रीगणेशा होणार आहे. मुंबई तसेच हिंदुस्थानचे दिवंगत माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) संबंधित क्लबमध्ये याअंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एमसीएच्या एपेक्स काऊन्सिल बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
कोचेस, सपोर्ट स्टाफच्या मानधनाचा मुद्दा मिटला
एमसीएअंतर्गत येणाऱया पुरुष व महिला या दोन्ही गटांतील अंडर 19, अंडर 25 व सीनियर या तिन्ही विभागांतील कोचेस व सपोर्ट स्टाफ यांच्या मानधनाचा मुद्दाही या बैठकीत मिटला. आतापर्यंतचे शिल्लक मानधन त्यांना देण्यात येणार आहे.
आऊटडोअर, इनडोअर क्रिकेट ऑपरेशन्ससाठी व्यवस्थापकाची निवड
या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एमसीएचे आऊटडोअर व इनडोअर क्रिकेट सांभाळण्यासाठी जनरल व्यवस्थापकाची निवड लवकरच करण्यात येणार आहे.



























































