शायनाचं आपलं मस्त चाललंय; दीड वर्ष झाले, फक्त आराम 

आशीष बनसोडे | मुंबई

लपूनछपून ड्रग्जची तस्करी करणाऱ्य़ा माफियांना पकडण्यासाठी दीड वर्षापूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या श्वान पथकात ‘शायना’ ही नार्कोटिक्सचे ट्रेनिंग घेतलेली श्वान दाखल झाली. पण तेव्हापासून शायनाच्या वाटय़ाला काही कामच आलेले नाही. तिचं आपलं मस्त चाललं असून फक्त आराम करीत आहे. असे असतानाच  तिच्या जोडीला आता ‘हनी’ नावाची श्वान आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकासाठी ‘शायना’ नावाची श्वान ऑक्टोबर 2018 मध्ये पोलिस दलात दाखल झाली.  राजस्थान येथे ड्रग्ज पकडायचे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन शायना आली होती. पण तेव्हापासून शायना फक्त आराम करतेय. केवळ एकदाच तिला कामानिमित्त बाहेर नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर शायना पुठेच गेली नाही. ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी तिला पुठे नेण्यात आले नाही. त्यामुळे कोणी काम देतं का काम? अशी अवस्था शायनाची झाली आहे. शायनालाच काही काम नसल्याने तिचे दोन हॅंडलरदेखील कामाविनाच आहेत. शायनाची काळजी घेणे एवढच काम हॅंडलर्सकडे राहिले आहे. शायनाकडे काम नाही. त्यात आता तिच्या जोडीला ‘हनी’ नावाची जर्मन शेफर्ड जातीची श्वान नुकतीच पोलिस दलात दाखल झाली आहे. गेल्या महिन्यात तिची ट्रेनिंग संपली आणि ती कामासाठी इन अॅक्शन झाली.

काम नाही, पण खर्च होतोय

मुंबईत ड्रग्जचा मोठा कारभार चालतो. गेल्या दोन वर्षात अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात धडक कारवाया केल्या. पण शायनाचा एकाही कारवाईत काडीचाही उपयोग झाला नाही. असे असताना हनीला नार्कोटिक्ससाठी दलात घेणे किती फायद्याचे ठरेल असा सवाल उपस्थित झाला आहे. या दोघींवर होणारा शासनाचा खर्च फुकट जातोय अशी चर्चा सुरू आहे.

शायनाच्या जोडीला आता हनी आली आहे. या दोन्ही श्वानांचा यापुढे आवश्यक तो वापर केला जाईल. त्यांच्याकडून काम करून घेतले जाईल. – दत्ता नलावडे, (उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी पथक)

आपली प्रतिक्रिया द्या