रिक्षातून सुरू होती ड्रग्ज तस्करी, हाय प्रोफाईलना द्यायचा ड्रग्ज

रिक्षातून ड्रग्ज तस्करी करणाऱया रिक्षाचालकाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने शनिवारी रात्री गोरेगावच्या नेस्को परिसरातून अटक केली. अफसर खान असे त्याचे नाव असून ‘एनसीबी’ने त्याच्याकडून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत तीन लाख रुपये आहे. अफसर हा मीरा रोड येथील एका नायजेरियनकडून कोकेन घेऊन ते अंधेरी, लोखंडवाला, वांद्रे, खार येथे काहींना देत असायचा.

‘एनसीबी’ने मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबईत तीन ठिकाणी कारवाई केली. एक रिक्षाचालक हा रात्रीच्या वेळेस ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली. त्या माहितीनंतर ‘एनसीबी’च्या पथकाने गोरेगावच्या नेस्को येथे सापळा रचून अफसरला ताब्यात घेतले. ‘एनसीबी’ने अफसरची कसून चौकशी केली. अफसर हा पहाटेच्या वेळेस रिक्षाने मीरा रोडला जात असायचा. तो एका नायजेरियनकडून ड्रग्ज घेत असायचा. तो नायजेरिन हा अफसरला कोणाला ड्रग्ज द्यायचे याची यादी आणि ड्रग्ज अफसरकडे द्यायचा. रात्रीच्या वेळेस अफसर हा अंधेरी, लोखंडवाला, वांद्रे, खार परिसरातील काहींना ड्रग्ज देत असायचा. ड्रग्ज देण्याच्या मोबदल्यात अफसरला 5-7 हजार रुपये मिळत असायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे. दुसरी कारवाई ‘एनसीबी’ने माहीम परिसरात करून 60 ग्रॅम एमडी आणि 360 ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा तस्करी करणाऱया फहद सलीम कुरेशीला ‘एनसीबी’ने अटक केली. ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’ने अफसर, सचिन आणि फहदला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ‘एनसीबी’ने कोठडी सुनावली आहे.

गांजा केक प्रकरणात तिसरी अटक

काही दिवसांपूर्वी ‘एनसीबी’ने गांजा केकच्या तस्करीचा प्रकार उघड केला होता. गांजा केकप्रकरणी ‘एनसीबी’ने दोघांना अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीनंतर ‘एनसीबी’ने सचिन तुपेला मरोळ परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एलएसडीचे 11 ब्लॉट्स जप्त केले आहे. सचिन हा त्या दोघांना ड्रग्ज पुरवत असल्याचे ‘एनसीबी’चे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या