नकली हॉलीवूड अभिनेत्याने वृद्ध महिलेला गंडवले 

हॉलीवूड अभिनेता असल्याचे भासवून ठगाने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून  तपास सुरू केला आहे. फसवणुकीची रक्कम एका खात्यात गेली असल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदार या लंडन येथे राहतात. त्यांची आई ही अंधेरीच्या सात बंगला परिसरात राहते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या आजारी असल्याने त्या ई-मेल पाहत नाहीत. जून महिन्यात तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या खात्यात 65 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. त्या रकमेबाबत त्यांनी त्यांच्या आईला विचारणा केली तेव्हा त्यांनी कियानो नावाचा हॉलीवूडचा अभिनेता हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मेसेज करत होता. त्याने आपण हॉलीवूड अभिनेता असल्याचे भासवले. भेटण्यासाठी हिंदुस्थानात येत असल्याच्या भूलथापा मारल्या.

हिंदुस्थानात येण्याच्या नावाखाली त्याने पैशाची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी एनईएफटीद्वारे ती रक्कम बँक खात्यात पाठवली. तो हॉलीवूड अभिनेता असल्यास तो आपल्या आईकडे पैशाची मागणी का करेल, असा प्रश्न तक्रारदार यांना पडला. त्यांनी कोणालाही पैसे पाठवू नये असे सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात  दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला.