
पार्सलचा बहाणा करून आलेल्या एकाने तरुणीला चाकूचा धाक दाखवून पैसे घेऊन पळ काढल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
तक्रारदार तरुणी ही अंधेरी पूर्व परिसरात राहते. सोमवारी सायंकाळी ती घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या घराची बेल वाजवली. बेल वाजवणाऱयाने तोंडाला रुमाल बांधला होता. त्याने पार्सलचे निमित्त तरुणीला सांगितले. कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे तिने सांगितले.
काही वेळाने एक जण तरुणीच्या घरी आला. त्या पार्सलचा त्याने बहाणा केला. तेव्हादेखील तरुणीने आपण कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे सांगितले. त्याने एका जणांचे नाव घेतले. तरुणीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही. ते पार्सल सुरक्षा रक्षकाकडे ठेवा, असे त्याला सांगितले. त्या हल्लेखोराने पत्ता दाखवण्याचा बहाणा करून तरुणीचा मोबाईल हिसकावून तो आत शिरला. घरात शिरल्यावर त्याने तरुणीला चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली व मारहाण केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.






























































