
करी रोडच्या अविघ्न पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील जैन मंदिरातील एक कोटी 75 लाख रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईत चोराला काळाचौकी पोलिसांनी पकडले. मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईलने त्याला पकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात 18 गुह्यांची नोंद आहे.
अविघ्न पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेल्या जैन मंदिरातील सोन्याचे विविध अलंकार व हिरे असा तब्बल एक कोटी 75 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित भोसले, हसन मुलानी, गोविंद खैरे, पोउपनि राजेंद्र चव्हाण, धनंजय व्यवहारे, शीतल माने, सागर बनकर, ऋषिकेश कर्नर व पथकांनी तपास सुरू केला. तांत्रिक बाबींच्या आधारे अधिक माहिती काढली असता आरोपीचे नाव जितेंद्र ऊर्फ जितन ऊर्फ बंटी ऊर्फ पंडित असे असून तो मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांची दोन पथके लगेच मध्य प्रदेशात धाडण्यात आली.
छतावरून पळत असताना…
चोरीचा ऐवज घेऊन आरोपी मध्य प्रदेशातील बहिणीच्या घरी लपला होता. पोलीस तेथे पोहचले, पण आरोपी ऐवज घेऊन नेपाळला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सपोनि मुलानी व नाईकवाडी यांनी नेपाळला जाणाऱया बस स्थानक परिसरात सापळा रचला व बसेस तपासल्या. तर राजेंद्र चव्हाण व खांडेकर, पवार यांनी आरोपीची बहीण कल्पना हिला ताब्यात घेऊन परिसरातील नातेवाईकांची घरे सर्च केली. आरोपी घराच्या छतावरून दुसऱया घराच्या छतावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पथकाने ताब्यात घेतले.



























































