
रिक्षाने प्रवास करणाऱया महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावून पळालेल्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी शोधून काढला. चोरटा सराईत गुन्हेगार असून त्याला कर्नाटकातून पकडून आणले.
आरती भिंगारदिवे या गृहिणी रिक्षाने प्रवास करत असताना अमर महल जंक्शन येथे वाहतूक कोंडीमुळे रिक्षाची गती मंदावली. याचाच गैरफायदा घेत एका चोराने त्यांच्या गळ्यातील अडीच लाख किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपी सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक डेमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल वाघमारे, उपनिरीक्षक गोल्हार तसेच शिंदे, भांड, पोमने, भुवड, साटेलकर, भोसले या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. पथकाने त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासले. तेव्हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार मोहम्मद इब्राहिम हनीफ शेख असल्याचे निष्पन्न झाले. तो कर्नाटकातील कलबुर्गी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने कलबुर्गी गाठून मोहम्मद इब्राहिम हनीफ शेख याला पकडून आणले.



























































