दहीहंडीचा काला झाला… रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिरात गोविंदा पथके व्यस्त

267

‘एक, दोन, तीन, चार …ची पोरं हुश्शार’ हा नारा दरवर्षी कानात घुमतो तो गोविंदा अर्थात गोपाळकालाच्या दिवशी. दहीहंडी म्हटली की, गोविंदा पथकांचा उत्साह हा नेहमीच शिगेला पोहचलेला असतो. मानवी मनोरे रचण्याची स्पर्धा, लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट, आयोजकांकडे होणारी सिनेकलाकारांची मांदियाळी. या सर्व उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथके न्हाऊन निघतात. यंदा मात्र या उत्साहावर कोरोनामुळे विरजण पडले. त्यामुळे मुंबईत आणि ठाण्यात दरवर्षी दिसणारा गोविंदा पथकांच्या थरांचा थरथराट यंदा काही दिसला नाही. पण दुसरीकडे यंदा मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी बुधवारी रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत नवा आदर्श निर्माण केल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.

मुंबईत आणि ठाण्यात दरवर्षी गोपाळकाला हा उत्सव मोठया आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दहीहंडी साजरा करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र गोविंदा समन्वय समितीतर्फे हा उत्सव यंदा साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. समन्वय समितीच्या या उत्सवाला मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी आणि आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे मुंबईत बुधवारी कुठेच दहीहंडीचे थर रचलेले दिसले गेले नाहीत. आयोजकांनीदेखील यंदा कोणत्याही स्पर्धेचे आयोजन न केल्याने दरवर्षीचा दहीहंडीचा उत्साह बुधवारी कुठेच दिसला नाही. काळाचौकी, दादर, लालबाग, परळ, गिरगाव, शिवाजी पार्क, वरळी, घाटकोपर, गोरेगाव आणि ठाण्यात कोरोनामुळे शुकशुकाट होता.

713 जणांचे रक्तदान

मुंबई आणि ठाण्यात बुधवारी तब्बल 713 गोविंदांनी रक्तदान केले. पालघरमध्ये सर्वाधिक गोविंदांनी रक्तदान केले असून ही संख्या तब्बल 187 इतकी नोंदविण्यात आली. कुर्ला पश्चिम येथील अंबिका सेवा मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने या वर्षी दहीहंडीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात मंडळाच्या सदस्यांसह गोविंदा पथकांमधील 79 गोविंदांनी रक्तदान केले.

साधेपणाने कृष्णजन्मोत्सव साजरा

समन्वय समितीच्या अहवालानुसार मुंबईत यंदा थरांची स्पर्धा रंगली नाही, पण मुंबईतील जवळपास सर्वच गोविंदा पथकांनी आपल्या संस्कृतींचे जतन करण्यासाठी अत्यंत साधेपणाने कृष्णजन्मोत्सव साजरा केला. मंगळवारी रात्री पारंपरिक पद्धतीने कृष्णपूजन करीत गोविंदा पथकांनी आपली परंपरा जपली. तर अनेक ठिकाणी जागेवाल्याचीदेखील पूजा करत गाऱहाणे घालून गोविंदा पथकांनी कृष्णजन्मोत्सव साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या