एफवायचा कटऑफ घसरणार, अनेक नवीन अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता जास्त… प्रवेशाचा मार्ग सुकर

सीबीएसईबरोबरच राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकालही यंदा कमी लागला आहे. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा कटऑफ यंदा खाली येणार आहे. यंदा राज्यभरातून केवळ 7 हजार 696 विद्यार्थ्यांनाच 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. याचा परिणाम कॉलेज कटऑफवर होण्याची शक्यता प्राचार्यांनी वर्तविली आहे. मात्र पदवी अभ्यासक्रमात समावेश झालेल्या नवीन कोर्सेसमुळे प्रवेश क्षमता वाढली आहे. मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून बारावीच्या परीक्षेत यंदा 2 लाख 90 हजार 258 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मुंबई विद्यापीठांतर्गत एफ.वाय. प्रवेशाच्या 3 लाख 86 हजार 769 जागा आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक सूचना विद्यापीठे आणि महाविद्यालयांना न दिल्यामुळे विद्यार्थी त्याचबरोबर प्राचार्यांमध्येही एफ.वाय. प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत उद्यापासून ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी आणि ऑफलाइन अर्ज विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र नव्या शैक्षणिक धोरणानुसार एफवायची फी कशी ठरवायची, याविषयी कोणत्याही सूचना प्राचार्यांना मिळालेल्या नाहीत. राज्य सरकारने येत्या काही दिवसांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सूचना जारी कराव्यात, अशी मागणीही प्राचार्यांनी केली आहे.

काही अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता

– एफवायबीकॉम 1 लाख 1 हजार 854
– एफवायबीए 48 हजार 339
– एफवायबीएससी 32 हजार 887
– एफवायबीएमएस 28 हजार 106
– एफवायबीएससी-आयटी 16 हजार 972
– एफवायबीएएफ 19 हजार 920
– एफवायबीएएमएमसी 9 हजार 536
-एलएलबी 13 हजार 889
– एफवायबीएससी सीएस 8 हजार 725
– बीएड 5 हजार 789

एनएम, मिठीबाई, सोमय्यात सीयूईटी
एनएम कॉलेज, मिठीबाई आणि सोमय्या विद्यापीठात सेल्फ फायनान्स कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रेन्स टेस्ट (सीयूईटी) द्यावी लागणार आहे. सीयूईटीमधील 50 टक्के आणि बारावीत मिळालेल्या 50 टक्के गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे, तर दक्षिण मुंबईतील झेवियर्स, जयहिंद कॉलेज बारावीच्या गुणांना 50 टक्के वेटेज देऊन प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा राबवीत आहेत.

इनहाऊस कोटय़ामुळे स्पर्धा कमी
मुंबई विद्यापीठांतर्गत 27 मे ते 12 जून यादरम्यान इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश प्रक्रिया होणार आहेत. या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. यंदाच्या निकालात मुंबई विभागातून द्वितीय श्रेणी म्हणजेच 45 टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 26 हजार 755, तर 35 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 47 हजार 297 इतकी आहे. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या महाविद्यालयात इनहाऊस कोटय़ाद्वारे प्रवेश घेण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक कोटय़ांतर्गत येणारे विद्यार्थी या कोटय़ाद्वारे आपला एफ.वाय. प्रवेश पक्का करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.