
मुंबईतील विविध कामांसाठी अर्थसंकल्पातून स्थायी समितीला 650 कोटींचा निधी मिळाला आहे. यामुळे मुंबईतील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. चार दिवस अर्थसंकल्पावर 23 सदस्यांनी आपली भूमिका मांडत अनेक उपाययोजना सुचवल्या. यानंतर फेरफारानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्पाला एकमताने मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली.
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी वर्ष 2021-22 चा 39038.83 हजार कोटींचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5797.81 कोटी वाढीचा हा अर्थसंकल्प आहे. सदस्यांनी सुचविलेल्या विकासाच्या मुद्दय़ानंतर 650 कोटींचा निधी स्थायी समितीला देण्यात आला. दरम्यान, स्थायी समितीला मिळालेला निधी कोणत्या पक्षाला किती द्यायचा याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहितीही जाधव यांनी दिली.
शिवसेनेमुळे रखडलेले 390 कोटी मिळाले
शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या कामांवर आक्षेप घेत एका पक्षाच्या नगरसेवकाने आक्षेप घेतल्यामुळे गेल्या वर्षीच्या निधीतील 390 कोटी आयुक्तांनी थांबवले होते, मात्र शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी तातडीने स्थायी समितीला देण्यात आल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या आक्षेपांमुळेच 250 कोटी घटले
स्थायी समितीला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांकडून पालिका आयुक्तांकडे आग्रह धरण्यात आला होता. यावेळी एक हजार कोटी रुपये स्थायी समितीला देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी 900 कोटी रुपये देण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात केवळ 650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळेच हा निधी कमी करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.


























































