विकासकामांच्या नूतनिकरणात लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशीला कायम राहणार

विकास निधी अंतर्गत तत्कालिन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे नूतनीकरण करताना मूळ उद्घाटनाच्या नावाची कोनशीला आता कायम राहणार आहे. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी पालिकेकडे केलेल्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने याबाबत ब सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत विविध मतदार संघांमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी विकास कामे करण्यात येतात. यात स्वच्छतागृहे, बालवाडी, व्यायामशाळा, समाजमंदिर आदींचा समावेश आहे. म्हाडा तसेच मुंबई महानगरपालिकेमार्फत लोकप्रतिनिधींच्या सुचनेनुसार ही विकास कामे करण्यात येतात. संबंधित विकास कामे करणार्‍या लोकप्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत तत्कालिन लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकांच्या नुतनीकरणावर खर्च करण्यात येतो. यावेळी जुनी कोनशीला काढून नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशीला लावण्यात येते. मुळात अनेक अडचणींचा सामना करत आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन लोकप्रतिनिधी त्यांच्या निधीचा सुनियोजित वापर करुन विभागात विकास कामे करीत असतात. नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक वेळा या विकासकामांचा पुनर्विकास न करता केवळ नुतनीकरण करतात. त्यामुळे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर तत्कालिन लोकप्रतिनिधीमार्फत बांधण्यात आलेल्या विकासकामांच्या मूळ उद्घाटनाची कोनशीला नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी काढणे अयोग्य असल्याचे मत रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त यांना जानेवारी 2020 मध्ये पाठविलेल्या लेखी पत्रात नमुद केले होते. याची दखल घेतली असून यावर उचित कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन आमदार तसेच माजी राज्यमंत्री वायकर यांना पालिकेने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या