द्वारकानाथ संझगिरी 

अरे कुणी तरी त्या विराट कोहलीला हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहास शिकवा रे! असेल तो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज! पण म्हणून त्याला अज्ञानापोटी 2000 सालापूर्वीच्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा अपमान करायचा हक्क नाही.

बरं झालं सुनील गावसकरने त्याचे कान उपटले! हिंदुस्थानी क्रिकेटची यशोगाथा दादा गांगुलीपासून सुरू झाली हे त्याला कुणी सांगितलं?

(एकदा त्याच्या सौ.ला नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला वगैरे माहीत आहेत का, हेसुद्धा तपासून घ्या. नाहीतर त्यांचा फिल्मी इतिहास माधुरी दीक्षितपासून सुरू होत असेल.)

गांगुलीने हिंदुस्थानी संघाला यश मिळवून दिलं यात वादच नाही, पण ती सुरुवात नाहीए. सुरुवात विशेषतः परदेशी जिंकण्याची सुरुवात विराट कोहली गेल्या जन्मात पन्नास वर्षांचा असतानापासून झालीए.

1968 साली न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पतौडीच्या संघाने 3-1 असं हरवलं होतं. आजच्या काळाचा संदर्भ द्यायचा तर अजित वाडेकर त्यावेळी मॅन ऑफ द सिरीज होता. त्यानंतर हिंदुस्थानी संघ 2008, 2009 पर्यंत सहावेळा न्यूझीलंडला गेला, पण कसोटी मालिका जिंकला नव्हता. दुष्काळ 2008-09ला संपला. यावरून 1968च्या यशाचं महत्त्व कळावं.

1971 साली त्याच अजित वाडेकरने वेस्ट इंडीज – इंग्लंडला त्यांच्या देशात हरवलं. आजचा वेस्ट इंडीजचा संघ त्या सर गारफिल्ड सोबर्स या सम्राटाच्या बुटाच्या उंचीएवढासुद्धा नाही आणि इंग्लड तर त्यावेळी जगज्जेता होता. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून ऍशेस जिंकलेला तो रे इलिंगवर्थचा संघ होता.1983 साली हिंदुस्थानी संघ कपिलच्या नेतृत्वाखाली थेट वर्ल्डकप जिंकला हे तरी कोहलीला ज्ञात असावं.

आणि 1984 साली लगेच ऑस्ट्रेलियात बेन्सन ऍन्ड हेजेस विश्वचषक आपण सुनील गावसकरच्या नेतृत्वाखाली जिंकला. तोही तसा वर्ल्डकपच.

1986 साली हिंदुस्थानी संघाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने हरवले. ब्राऊन वॉशच व्हायचा पण पावसाने शेवटच्या कसोटीत घाण केली. त्यावेळी दिलीप वेंगसरकरने हेडिंग्ले लिड्सच्या खेळपट्टीवर ठोकलेलं शतक, हिंदुस्थानी क्रिकेटच्या शतकांच्या यादीत खूप वर जाऊन बसेल. त्यानंतर हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये थेट 2007 साली जिंकला आणि त्यानंतर अजून नाही. इंग्लंडमध्ये जिंकणं किती कठीण हे विराटला सांगायला नको.
ऑस्ट्रेलियातही 1981 आणि 1985-86 साली कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. गेल्यावर्षी पहिल्यांदा आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं.

त्यामुळे एक गोष्ट लक्षात येईल की, यशोगाथेचे अनेक धडे आधी लिहिले गेले होते. पण विराट कोहलीने विषय ऑप्शनला टाकल्यामुळे त्याला ठाऊक नव्हते.क्रिकेटचा इतिहास ठाऊक नसणारा विराट कोहली हा हिंदुस्थानचा पहिला क्रिकेटपटू नाही.

1981 साली ऑस्ट्रेलियात सर्वत्र व्हिक्टर ट्रंपरचे फोटो का आहेत हे कपिल देवला ज्ञात नव्हतं.एकदा श्रीनाथ माधव आपटेंच्या घरी गेला होता. तो दाढीवाल्या डॉ. डब्ल्यू. जी. गेसच्या फोटोकडे एकटक पाहत उभा राहिला आणि मग विचारलं, ‘तो रणजी रणजी म्हणतात, तो हाच काय?’

1997 साली पाकिस्तानच्या दौऱयावर मी किमान सात-आठ खेळाडूंना सिंधू नदीबद्दल विचारलं होतं. फक्त रॉबिन सिंगला ठाऊक होतं. मग कळलं रॉबिन सिंगचं शिक्षण वेस्ट इंडीजमध्ये झालं होतं.

2003 साली महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेत ट्रेनमधून खाली उतरवलंय हे दोन-चार जण सोडले तर हिंदुस्थानी संघातल्या कुणालाही ठाऊक नव्हते.

असो. अशी अनेक स्वानुभवातली उदाहरणं मी देईन. सामान्यज्ञान सोडा, पण क्रिकेटचा इतिहास क्रिकेटबोर्डाच्या स्तरावर निदान जुजबी तरी यांना शिकवायला हवा. त्यांना कळू देत की आजच्या युगात विजय मर्चंट, विजय हजारे खेळले असते तर त्यांनी गावसकर, तेंडुलकर, द्रविड, विराटच्या बरोबरीने धावा केल्या असत्या. विजय मांजरेकर – बोर्डे आजच्या युगात असते तर पुजारा-रहाणे हिंदुस्थानी संघात नसते. विनू मंकड समोर रवींद्र जाडेजा आणि प्रसन्ना पुढे अश्विन म्हणजे खासदारासमोर नगरसेवक. सुभाष गुप्तेला शेन वॉर्नने कुर्निसात केला असता आणि नरेन ताम्हाणेनी वृद्धिमान साहाला बरचं काही यष्टीरक्षणातलं शिकवलं असतं. मुंबईच्या खेळाडूंना त्यांची परंपरा निदान काही वर्षांपर्यंत तरी ज्ञात होती. कारण ती एका पिढीतून दुसऱया पिढीत झिरपायची. आता ते झिरपणं थांबतंय… कारणं क्लब क्रिकेटच्या शिडीवरून चढून झालं की, प्रत्येकजण ती शिडी दूर फेकतो आणि वर्तमानात इतका हरवतो की, मागचं क्रिकेट त्याच्यासाठी जुन्या रद्दीसारखं असतं. आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी होतं. तसा आजचा खेळाडू उद्या माजी होतो. माजी म्हणून जगताना आपण रद्दी झाल्याची भावना होईल ना तेव्हा त्यांना इतिहासाचं महत्त्व कळेल.बरं झालं सुनील गावसकरने या पिढीला चार खडे बोल सुनावले >[email protected]>

आपली प्रतिक्रिया द्या