शेतकरी तुम्हाला आणि तुमच्या कायद्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही!

देशाचा कष्टकरी, अन्नदाता दिल्लीच्या सीमेवर गेले 60 दिवस कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी आंदोलनाला बसला आहे. कडाक्याची थंडी, उन्हातान्हात शेतकरी आंदोलन करीत आहे. पण देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना शेतकरी आणि कष्टकऱयांविषयी कवडीचीही आस्था नाही. संसदीय पद्धत उद्ध्वस्त करून बहुमताच्या जोरावर कायदे पास कराल, पण एकदा या देशाचा सामान्य माणूस आणि शेतकरी उठल्यानंतर हा कायदा आणि तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारला दिला.

आझाद मैदान येथे शेतकरी मोर्चाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, पंजाब, हरीयाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थानच्या शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर जे अभूतपूर्व आंदोलन केलं त्या आंदोलनाला आणि त्या सगळ्या कष्टकरी शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. पण ही लढाई सोपी नाही. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकरी आणि कष्टकऱयांविषयी कवडीचीही आस्था नाही. तुम्ही पायाला आलेल्या फोडाची आणि ऊन्हातान्हाची पर्वा न करता शेतकऱयांच्या भवितव्यासाठी इथे आलात. पण तुमच्याशी खेळ करण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांना धडा शिकवण्याचीं कामगिरी आपल्याला करावी लागणार आहे.

पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का?

पंजाब, हरीयाणा, वेस्टर्न यूपीतील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलाय. देशाच्या पंतप्रधानांनी त्याची चौकशी केली आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. तो पंजाबचा शेतकरी आहे अशी चर्चा केली जाते. पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय सामान्य शेतकरी आहे काय, स्वातंत्र्याच्या आंदोलनात जबरदस्त किंमत देणारा, जालियनवालासारखा इतिहास घडवणारा. स्वातंत्र्यानंतर चीन किंवा पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर या भूमीचं रक्षण करणारा. 115 ते 120 कोटींना अन्न देणारा हा बळीराजा माझ्या पंजाब, हरीयाणा, उत्तर प्रदेशमधला आहे. त्याच्याबद्दल केंद्र सरकारची जी नाकर्तेपणाची भूमिका आहे तिचा निषेध करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावले.

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱयांसाठी वेळ नाही!

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल भेटले नाहीत. आज राज्यातील शेतकरी, कष्टकरी राज्यपालांना निवेदन देण्यासाठी इथे आला आहे. पण राज्यपाल गेले गोव्याला. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱयाला भेटायला वेळ नाही. राज्याच्या राज्यपालांची नैतिक जबाबदारी होती की राज्याचा अन्नदाता निवेदन देण्यासाठी इथे येत आहे. अशावेळी त्यांनी सामोरे जायला हवं होतं. पण तेवढी सभ्यता नाही. राजभवनात तरी बसायला हवं होतं पण तेही त्यांनी केलं नाही, अशी घणाघाती टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱयांची भेट न घेतल्याबद्दल शरद पवार यांनी केली.

डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेचा अपमान

कोणतीही चर्चा न करता संसदेत हे कायदे मांडले गेले. एका अधिवेशनामध्ये एका दिवसात एकदम तीन कायदे मांडले आणि हे तिन्ही कायदे आजच्या आज मंजूर झाले पाहिजेत असं सांगितलं. सर्व विरोधी पक्षनेत्यांनी या कायद्यांची चर्चा करण्याची मागणी केली. कायद्याची सखोल चर्चा करण्यासाठी पार्लमेंटच्या स्वतंत्र कमिटीकडे कायदा पाठविण्याची मागणी केली. या कमिटीत सर्व पक्षांचे लोक असतात, पण केंद्र सरकारने चर्चा नाही, कमिटी नाही, जसाच्या तसा कायदा पास करण्याची भूमिका घेतली. विरोध केल्यानंतरही चर्चा न करता हे तिन्ही कायदे पास झाले म्हणून जाहीर केले. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा अपमान आहे. पंजाब, हरयाणा, वेस्टर्न यूपीतील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलाय. देशाच्या पंतप्रधानांनी त्याची चौकशी केली आहे का? तो पंजाबचा शेतकरी आहे अशी चर्चा केली जाते. पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का?

आपली प्रतिक्रिया द्या