माझगावच्या जीएसटी भवनात हाहाकार; शिस्त आणि प्रसंगावधानामुळेच वाचले दोन हजार कर्मचाऱ्यांचे प्राण

605

माझगावच्या जीएसटी भवनात दुपारी लंच टाइमला जाण्याआधी कर्मचारी काम संपवण्याच्या गडबडीत होते. इतक्यात कुणीतरी ओरडले वरच्या मजल्यांवर आग लागली… धावा धावा. एकच गोंधळ उडाला पण या क्षणी कर्मचाऱयांनी राखले ते प्रसंगावधान. कोणताही आततायीपणा न करता आपल्या सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. महिला आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना आधी वाट करून देण्यात आली. लिफ्ट आणि जिन्यांवर गोंधळ माजणार नाही याची काळजी तरुण कर्मचाऱयांनी घेतली. त्यामुळे ना रेटारेटी झाली ना चेंगराचेंगरी. भीषण आग लागली असतानाही दोन हजार कर्मचारी सुखरूपपणे बाहेर पडले. कर्मचाऱ्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि शिस्तीनेच त्यांचे प्राण वाचले.

माझगावमध्ये शिवदास कापसी मार्गावर राज्य सरकारच्या जीएसटी भवनची ही दहा मजली इमारत आहे. या इमारतीत 12.32 वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटने आगीची ठिणगी पडली. आगीची माहिती मिळताच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱयांना माहिती दिल्याने दोन ते सवादोन हजार कर्मचाऱयांना शिस्तबद्ध पद्धतीने इमारतीबाहेर निघाले. मात्र इमारतीत हजारोंच्या संख्येने असणाऱया फाईल्स, कागदपत्रे, फर्निचर आणि इलेक्ट्रिक सामग्री-वायरिंगमुळे क्षणार्धात आग क्रमांक-3 ची तर पुढील काही वेळातच सर्वात मोठी म्हणजे क्रमांक-4 ची आग असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. नवव्या मजल्यावर भडका उडालेल्या आगीने आठव्या आणि दहाव्या मजल्यालाही वेढल्याने या ठिकाणच्या साहित्याचा कोळसा झाला. सुमारे तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या 120 जवानांनी 20 हून अधिक वाहनांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. ‘एनडीआरएफ’चे जवानही यावेळी आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर तैनात ठेवण्यात आले होते. दरम्यान, या आगीत पाचव्या मजल्यावर एक कर्मचारी अडकला होता. अग्निशमन दलाने त्याची सुखरूप सुटका केल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. आगीची माहिती मिळताच स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनीदेखील दुर्घटनेचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.

व्हीजेटीआयने केले होते स्ट्रक्चरल ऑडिट

ग्राऊंड प्लस दहा मजल्यांची ही जीएसटी भवनाची इमारत आहे. यामध्ये नवव्या मजल्यावर दहावा मजला टॅक्सच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची शेड उभारून वाढवण्यात आला होता. व्हीजेटीआयने 2019 मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट अहवालानुसार इमारतीवर लोड वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने हा मजला हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती एका कर्मचाऱयाकडून सांगण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या बैठकीतून निघून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्याचा आढावा घेऊन आवश्यक सूचनाही दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, आमदार यामिनी जाधव उपस्थित होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. आगीच्या घटनेसंदर्भात पालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक वळवण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, आगीत जळालेल्या फाईल्स-कागदपत्रांचा आढवा घेण्यात येणार असून हे रेकॉर्ड ऑनलाइन असल्याने सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.

कुणाल जाधवने तिरंगा वाचवला

जीएसटी भवनला आग लागलेली आग झपाटय़ाने वाढत असताना तळमजल्यावर असलेले कर्मचारी कुणाल जाधव यांनी जिवाची पर्वा न करता नवव्या मजल्यावर धाव घेऊन तिरंगा सुरक्षितरीत्या आणि सन्मानपूर्वक उतरवला. कुणाल यांनी दाखवलेल्या धैर्याबाबत सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. कुणाल हे जीएसटी भवनमध्ये गेल्या 16 वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत आहेत. देशाबद्दल असलेल्या प्रेमामुळेच आपण हे धाडस केल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली.

आगीचा भडका उडाला तेव्हा मी सहाव्या मजल्यावर होतो. याच वेळी साडेबारा वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने कर्मचाऱयांच्या सहकार्याने माहिती पोहचवण्याचे काम केले. आगीने वेढलेल्या तीनही मजल्यावरील कर्मचाऱयांनी इमारतीबाहेर धाव घेतल्याने कुणीही जखमी झाले नाही. – उदय बाळापुरे, प्रत्यक्षदर्शी कर्मचारी

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार जीएसटी भवन इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणाही होती. मुंबईतील सरकारी इमारतींसह सर्व सोसायटय़ांना अग्निसुरक्षेची यंत्रणा सक्षम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या माध्यमातून सर्व आस्थापने-सोसायटय़ांमधील अग्निसुरक्षेचे नियमित ऑडिट सुरू असून अग्निसुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. – प्रवीण परदेशी, आयुक्त, पालिका

रेकॉर्ड ऑनलाइन असल्याने सुरक्षित

जीएसटी भवनला लागलेल्या आगीत महत्त्वाच्या हजारो फाईल्स आणि कागदपत्रे, कॉम्युटर्सचा कोळसा झाला आहे. मात्र हे संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाइन असल्याने यामध्ये सर्व माहिती सुरक्षित असल्याची माहिती वस्तू व सेवा कर संघटनेचे सेक्रेटरी सुबोध किर्लोसकर यांनी दिली.

…म्हणूनच मोठा अनर्थ टळला

राज्य सरकारचे जीएसटी कार्यालय असलेल्या इमारतीत सुमारे साडेतीन हजार कर्मचारी काम करतात. या इमारतीच्या स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटनुसार ऑक्टोबरपासून या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आगीची ठिणगी पडलेल्या नवव्या मजल्यावरील सुमारे अडीचशे कर्मचाऱयांना दोन महिन्यांपूर्वीच लवलेन एमटीएनएल कार्यालयात शिफ्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आगीचा भडका उडाल्याच्या वेळी फायर अलार्म वाजताच सुमारे 70 ते 80 कर्मचाऱयांनी इमारतीबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी सुबोध किर्लोसकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या