
मुंबई महानगरपालिकेने या वर्षी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या खर्चात तब्बल 40 टक्के कपात केली आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि समुद्राला एकच वेळी भरती आल्यास मुंबईला ‘पुराची मगरमिठी’ पडण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पालिका कोणत्या उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत भांडूप फिल्टर पाडा विहार तलाव परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे. मात्र नदीच्या पात्रात गाळ राहिल्यास अतिवृष्टीच्या वेळी समुद्राला भरती असल्यास पाणी शहरात घुसून मुंबईकरांची गैरसोय होते. पूर्व उपनगरात 17.80 किमी वाहणारी मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरातून वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला मिळते. या नदीचा सर्वाधिक भाग पूर्व उपनगरात येत असून अतिवृष्टीत कोणताही धोका राहू नये यासाठी पावसाळ्याआधी नदीमधील गाळ काढून पाण्याचा मार्ग स्वच्छ प्रवाही करण्यासाठी अत्याधुनिक मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे. मात्र खर्चात केलेल्या कपातीमुळे गाळ काढण्याच्या कामावर परिणाम होण्याचा धोका आहे.
…तर खर्च वाढवणार
महापालिकेने गेल्या आठवडय़ाच्या शेवटी 1.65 लाख टन गाळ काढण्यासाठी नवीन निविदा (टेंडर) काढली. गेल्या वर्षी हे प्रमाण 2.67 लाख टन होते. त्यामुळे पंत्राटाची किंमतही जवळपास निम्म्यावर आली असून ती 48 कोटींवरून 29.5 कोटींवर आली आहे. मात्र महापालिकेच्या अधिकृत स्पष्टीकरणात कामांच्या अंदाजात फुगवटा होता, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र गरज भासल्यास गाळ काढण्याच्या खर्चात वाढ केली जाऊ शकते अशी शक्यताही पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
अशी आहे सद्यस्थिती
मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम दरवर्षी तीन टप्प्यांत केले जाते. यासोबतच शहरातील मोठय़ा आणि लहान नाल्यांमधील गाळही काढला जातो. गेल्या वर्षी दोन वर्षांच्या करारासाठी तीन कंपन्यांना पंत्राट देण्यात आले होते. मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकणे तसेच पंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे दोन कंपन्यांनी काम पूर्ण केले नाही. त्यानंतर महापालिकेने करार रद्द करून तिन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकले. त्यामुळे मिठी नदी स्वच्छतेचे काम काही काळ अडचणीत आले. कपात केल्यामुळे निविदा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी निवडलेल्या पंत्राटदारांनी काम सोडल्यामुळे यंदा नवीन पंत्राटदार पुढे येतील का, याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.































































