मुंबईतील उड्डाणपूल, महामार्गांवर वाहनचालकांना ब्रेक

मुंबईमध्ये वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल आणि महामार्गांवर वाहनांच्या वेगाला लगाम घातला आहे. वाहनांसाठी ठरावीक वेगमर्यादा देण्यात आली असून तिचे पालन न करणाऱया वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मोटर वाहन अधिनियमनांतर्गत वाहतूक पोलीस विभागाने ही नवी वेगमर्यादा घातली आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग, ईस्टर्न फ्री-वे, वांद्रे-वरळी सी-लिंक, शीव-पनवेल महामार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, लालबाग उड्डाणपूल, जे. जे. उड्डाणपूल आणि मरीन ड्राइव्ह येथे वाहन चालवताना चालकांना वेगाला आवर घालावा लागणार आहे. वाहनांच्या वेगाला मर्यादा घातली गेली तर संभाव्य अपघात मोठय़ा प्रमाणावर रोखता येऊ शकतील आणि अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतील असा वाहतूक पोलिसांना विश्वास आहे.

…अशी असेल वेगमर्यादा

  • सी लिंक, फ्री-वे – ताशी 80 किमी
  • पूर्व द्रुतगती, शीव-पनवेल महामार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, लालबाग उड्डाणपूल – ताशी 70 किमी
  • जे. जे. उड्डाणपूल – ताशी 60 किमी
  • मरीन ड्राइव्ह – ताशी 65 किमी
आपली प्रतिक्रिया द्या