मुंबईजवळ समुद्रात बोट बुडाली, गेट वेच्या किनाऱ्यावर गुजरातच्या नौकेला जलसमाधी,

गुजरातच्या वेरावळमधून मासेमारी करण्यासाठी आलेली बोट आज गेट वे ऑफ इंडिया आणि उरणदरम्यानच्या समुद्रात बुडाली. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. आजूबाजूच्या बोटींनी तत्काळ मदतकार्य करून बुडणाऱया खलाशांना वाचवले. या खलाशांना दुसऱया बोटीतून उरणच्या मोरा बंदर येथे नेण्यात आले. दरम्यान गुजरातच्या नवाबंदरजवळ समुद्रात गेलेल्या पालघरमधील चार मच्छीमार नौका वादळात भरकटल्या, मात्र या बोटींवरील 50 खलाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.

गुजरातमधील काही बोटी मासेमारीसाठी महाराष्ट्राच्या हद्दीत तर काही महाराष्ट्रातील बोटी गुजरातच्या हद्दीत गेल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने या मासेमारी बोटी वादळात अडकल्या. बंदराचा आसरा घेण्यासाठी वेरावळ येथून आलेली मासेमारी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ अचानक उलटली. यावेळी खलाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. याचवेळी आजूबाजूने जाणाऱया बोटीतील तांडेल आणि खलाशांनी या बोटीवरील खलाशांना वाचवले.