मुंबईला लवकरच मिळणार 2 लाख रेमडेसिवीर; महापालिकेने दिली ऑर्डर

कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया रेमडेसिवीरची 2 लाख इंजेक्शन्स मुंबईला मिळणार आहेत. मुंबई महापालिकेने याची ऑर्डर मायलन लॅबोरेटरीजला दिली असून पालिकेच्या 14 रुग्णालयांना ही इंजेक्शन्स वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, मोहिमांसह जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसिवीर आणि सिप्लाच्या पेरिफेरील इंजेक्शन्सचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र पालिकेची कोरोना रुग्णालये, जम्बो कोरोना सेंटर्स तसेच कोरोना केंद्रात कोणताही तुटवडा नसल्याचे पालिकेने आधीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत 100 एमजीची 2 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन मागवली जाणार असून प्रत्येक इंजेक्शन्ससाठी 1,568 रुपये मोजले जाणार आहेत.

मुंबईत सलग दुसऱया दिवशी रुग्णसंख्या घटली

मुंबईत सलग दुसऱया दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असून आज दिवसभरात 7 हजार 898 रुग्ण सापडले तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत असून आज 11 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले तर 26 जणांचा मृत्यू झाला.

अशी मिळणार इंजेक्शन्स

केईएम – 8 हजार, शीव रुग्णालय – 8 हजार, नायर – 10 हजार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर – 5 हजार, सेव्हन हिल्स – 50 हजार , सर्वसाधारण रुग्णालये – 14 हजार, एनएससीआय जम्बो कोरोना सेंटर – 12 हजार, नेस्को जम्बो सेंटर – 20 हजार , रिचर्डसन अँड क्रुडास – 12 हजार, दहिसर कोरोना सेंटर – 20 हजार,  बीकेसी जम्बो सेंटर्स – 20 हजार, कस्तुरबा रुग्णालय – 10 हजार, मध्यवर्ती खरेदी विभाग – 6 हजार, कूपर रुग्णालय – 5 हजार

आपली प्रतिक्रिया द्या