
लोणावळा येथील ड्युक्स नोज पॉईंट येथे ट्रेकिंगसाठी गेलेली तरुणी ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. तब्बल दहा तासांच्या सर्च ऑपरेशननंतर तरुणीचा मृतदेह सापडला. श्रेया पती असे दुर्दैवी गिर्यारोहक तरुणीचे नाव असून ती नवी मुंबई येथे राहणारी होती. हा अपघात आहे की, घातपात याचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.
ट्रेकिंगची आवड असल्यामुळे नवी मुंबई येथे राहणारी श्रेया पती एकटीच लोणावळ्याच्या ड्युक्स नोज पॉईंटवर फिरायला गेली होती. मात्र अचानक पाय घसरल्याने ती ४०० फूट खोल दरीत कोसळली. यात तिचा मृत्यू झाला. रात्र झाली तरी मुलगी घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी लोणावळा गाठले आणि ड्युक्स नोजच्या पायथ्याशी असलेल्या गावात तरुणीची चौकशी केली. श्रेया याठिकाणी फिरून परत गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नातेवाईकांनी लोणावळा पोलीस ठाण्यात तरुणी हरवल्याची तक्रार दिली.
शोधकार्यात अडथळे
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. टायगर पॉईंट येथे श्रेयाची बॅग सापडल्याने त्याच परिसरात डॉग स्कॉड, ड्रोन व सामाजिक कार्यकर्त्यांनी तरुणीचा शोध घेतला. गिर्यारोहक अनिल सुतार हे दोरीच्या सहाय्याने ३९० फूट खोल दरीत उतरले. त्यावेळी त्यांना तरुणीचा मृतदेह सापडला. बचाव पथकाने मृतदेह स्ट्रेचरच्या सहाय्याने वर आणला.




























































