धो-धो पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डांबराची फवारणी, ठेकेदाराची खुलेआम साठमारी

मुंबई-गोवा महामार्गावर जुलै महिन्यात धो-धो पावसात खडीवर डांबराची फवारणी करण्याचा प्रताप ठेकेदार कंपनीने केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ दरम्यान वाशी नाका येथे होटेल पुष्पक समोर ठेकेदाराने धो धो पावसात डांबराची फवारणी केली आहे.

3 जुलै ते 6 जुलै यादरम्यान मुंबई व रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. असे असताना देखील धो धो पावसात या महामार्गावर कंत्राटदार कंपनीने रस्त्यावरील खडीवर डांबराची फवारणी केली आहे. मुळातच रस्ता ओला असताना त्यावर डांबर टाकल्यास ते चिकटतच नाही. त्यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होते, म्हणून 25 मे नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा नियम आहे. असे असताना देखील कंत्राटदार कंपनीने केवळ अधिकाऱ्यांच्या व जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याकरता सदरचे काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पाण्याचा निचरा होण्याचा नैसर्गिक मार्ग बंद केला
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करीत असताना सदर कंत्राटदार कंपनीने वाशी नाक्यावरील होटेल पुष्पक समोरील पाण्याचा जाण्याचा मार्ग असलेली मोरी भराव टाकून बंद केली आहे. त्यामुळे रोडे व काश्मिरे गावातील येणारे पाणी हॉटेल पुष्पकच्या समोर व सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या शेतांमध्ये जाऊन तेथे तळे साचत आहे, असा आरोप विश्वनाथ गायकर यांनी केला आहे.

याच मार्गावरती पुढे हॉटेल कोकण पॅलेस शेजारी कांदरपाडा गावाचा जुना पाणी जाण्याचा नैसर्गिक नाला आहे. सदर नाला रस्त्याच्या जवळ येऊन पुढे वडखळ च्या दिशेने नैसर्गिक स्वरूपात जात होता. परंतु या वळणावरती ठेकेदार कंपनीने 5 ते 6 फूट भराव करून येथे सर्विस रोड बनवल्याने सदरचे नाल्याचे पाणी पुढे जात नाही. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या पुलावरून येणारे पाणी व सर्विस रोड वरील पाणी या नाल्यात मध्ये जात असल्याने सदर नाल्याचे पाणी गावातील 20 ते 25 घरांमध्ये शिरते. हे पाणी शेतात साचत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे अशी तक्रार कांदळेपाडा गावचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी केली. नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद करण्यापूर्वी ठेकेदार कंपनीने सांड पाणी जाण्याकरिता पर्यायी व्यवस्था करायला हवी अशीही मागणी सरपंचांनी केली आहे.

तक्रार करूनही कारवाई नाही
कांदळेपाडा गावचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी यासंदर्भात पेणच्या प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनही आजतागायत कारवाई झालेली नाही असा आरोप त्यांनी केला. धो धो पावसात महामार्गावर डांबराची फवारणी संदर्भात अधिक माहिती घेऊन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदार कंपनी वरती कारवाई करण्याकरिता कळविण्यात येईल अशी प्रतिक्रिया पेणच्या प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या