
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे व पालघर जिह्यातून कोकणात एसटी महामंडळाच्या पाच हजार जादा बसगाडय़ा जाणार आहेत. त्यासाठी सज्ज असलेल्या महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांची धास्ती घेतली आहे. खड्डय़ांमुळे होणारे ब्रेकडाऊन लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात महामंडळाची 12 दुरुस्ती पथके आणि दोन पाळय़ांमध्ये कर्मचारी तैनात राहणार आहेत.
यंदाच्या पावसाळय़ात मुंबई-गोवा मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. त्याचा फटका एसटी बसगाडय़ांना बसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जादा गाडय़ांची व्यवस्था करताना एसटी महामंडळाने बोरिवलीतील नॅन्सी कॉलनीपासून ते सावंतवाडीपर्यंत 12 दुरुस्ती व देखभाल पथके नेमली आहेत.
एसटी महामंडळाच्या मुंबई विभागासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर आदी भागांतील एसटी बसगाडय़ा कोकणात धावणार आहेत.
यांत्रिक कर्मचारी, अभियंत्यांची नेमणूक
महामार्गावरील खड्डय़ांमुळे आधीच एसटीला फटका बसला आहे. त्यामुळे गाडय़ांचा तुटवडा जाणवत असल्याने गणेशोत्सव काळात वेळीच गाडी दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी दुरुस्ती पथकात वीजतंत्री, टायर फिटर, सहाय्यक कारागीर/ सहाय्यक आदी यांत्रिक कर्मचारी तसेच चार उपयंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विभाग नियंत्रकांना आदेश जारी केले आहेत.