मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर जवळ भीषण अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. राजापूर तालुक्यातील ओणी तिवंदामाळ परिसरात सकाळी पावणे अकराच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत एका चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महामार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा ते मुंबई अशा दिशेने जाणारा टाटा कंपनीचा एक ट्रक ओणी तिवंदामाळ येथील एका धाब्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या भरधाव ट्रकने या उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की भारत बेंझ ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात भारत बेंझ ट्रकच्या चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक कोंडी सोडवली. मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे सत्र वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.