भोस्ते घाटातील अवघड वळणावर पुन्हा कंटेनर उलटला, चालक गंभीर जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर सुरु असलेली अपघाताची मालिका अद्याप थांबलेली नाही. शुक्रवारी सकाळी घाट उतरणाऱ्या ट्रेलर चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने ट्रेलर पलटी झाला. या अपघातात ट्रेलर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चालकाला उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रेलर पलटी झाल्यावर महामार्गवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करून महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. मात्र ट्रेलर रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी मागवण्यात आलेल्या क्रेन्समुळे वाहतुकीला अडथळा होत होता. चार ते पाच क्रेन्सच्या साहाय्याने हा ट्रेलर मोठ्या मुश्किलीने बाजूला करण्यात आला.