मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार, चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने बचावला

मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी एका कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. वेळीच खबरदारी घेतली गेल्याने काही वेळातच भडकलेली आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला.

आज दुपारी 12 वाजता पीरलोटे येथील हॉटेल पार्वतीनजीक एका चालत्या ट्रकच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून बाहेर उडी मारली. काही कळायच्या आत ट्रकच्या केबिनला आग लागली आणि महामार्गावर हल्लकल्लोळ निर्माण झाला.

खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी व अन्य नागरीक यांनी वेळीच खबरदारी घेऊन आग विझवली आणि अनर्थ टळला. या दुर्घटनेत ट्रकचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या