
गेल्या 11 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा वायदा पोकळ ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण या महामार्गावरील तब्बल 11 मोठमोठी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. शिवसेनेचे लाकेसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी आज या अर्धवट कामांची यादीच केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिली.
मागील आठवडय़ात अरविंद सावंत यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. या मार्गाला खूप विलंब झाल्याचे नितीन गडकरी यांनी मान्य केले, मात्र 89 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित एप्रिलपर्यंत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर अरविंद सावंत यांनी एका पत्राद्वारे महामार्गावरील प्रलंबित कामे व त्यातील त्रुटींकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. ही कामे दिलेल्या वेळेत व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ही आहेत रखडलेली कामे
- पळस्पे ते कासू दरम्यानचा खारपाडा व दूरशेत पूल खड्डेमुक्त करणे, पेण-रामवाडी पुलावरील पाण्याचा निचरा. पाणी तुंबण्याच्या समस्या.
- कासू ते इंदापूरमधील आमटेम, कोलेटी, नागोठणे, खांब, पुईगाव, कोलाड, तळवली पूल व बाह्य रस्ता अपूर्ण. वाकण नदीपूल खड्डेमुक्त करणे.
- इंदापूर ते वडपालेदरम्यान इंदापूर व माणगाव पुलाचे काम, मुगवली बाह्य रस्ता तळेगाव वाडी पॅच वर्क, लोणेरे पूल व बाह्य रस्ता, पोलादपूर घाट उतारावर अर्धवट स्पीड ब्रेकर.
- वडपाले ते भोगावमधील सावित्री नदी पूल व जवळच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य. पोलादपूरमध्ये पादचारी पूल.
- कशेडी पूल खड्डेमुक्त करणे. कशेडी बोगद्यात पाणी गळती.
ही कामेही अर्धवट
भरणे नाका बाह्य रस्ता वळण अडचणीचे, खेड रेल्वे स्थानक येथील पुलाचे काम व बाह्य रस्ता। भोस्ते घाट वेग गतिरोधक, आवशी पलू व बाह्य रस्ता, लोटे आणि धामणदेवी येथील खड्डेमय बाह्य रस्ता । आरवली येथील दुसरी मार्गिका, संगमेश्वर रेल्वे स्टेशन अलीकडील रस्ता, कसबा पूल, संगमेश्वर उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. तिथे अरुंद रस्ता आहे. भावनदी ते सोनगिरी सगंमेश्वर टप्प्यात अनेक कामे बाकी आहेत. खड्डे, भूस्खलन, पाण्याच्या निचऱ्यात समस्या कायम आहेत.। राजापूर घाट उतारावर स्पीड ब्रेकर, कणकवली पुलाचे ऑडिट व्हायला हवे.
बाव नदी ते निवळी रस्ता काम सुरू आहे, परंतु पर्यायी रस्ता खराब आहे, रिफ्लेक्टरचा अभाव, टोलगेट ते कोकजे पठारमधील घाट भागही खराब आहे, निवळी-डांगरवाडी येथील उड्डाणपूल, हातखंबा येथील नवीन रस्त्याचे काम बाकी आहे. पाली उड्डाणपूल अपूर्ण असून बाह्य रस्ता खराब आहे. अंजणी ते मठमधील काही काम बाकी आहे. लांजा येथील उड्डाणपूल व रस्त्याचे बरेच काम बाकी आहे.


























































