
गेली अनेक वर्षे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या जुन्या नावाने मुंबई-गोवा अर्थात एन एच 16 व नव्याने ओळखला जाणारा पनवेल कन्याकुमारी अर्थात एन एच 66 या दुपदरी रस्त्याची दुरवस्था व्हायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी चक्क काँक्रिटमधल्या शिगा बाहेर आल्याने भरधाव वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कामाची कुर्म गती, यामुळे महिनोन्महिने होणारी वाहतूककोंडी, तर कुठे चिपळूणसारख्या ठिकाणी सुरू असलेले वर्षानुवर्षाचे उड्डाणपुलाचे काम, त्यातूनच कोसळणारे पूल या साऱयाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा हायवेचे काम सुरू झाल्यापासून ड्रायव्हर्जनमुळे रात्री झालेल्या अपघातांची संख्या अमोज आहे. तसेच रस्त्यांच्या कामांमुळे झालेले अपघातदेखील असंख्य आहेत. कामामुळे उडणाऱया धुळीमुळे रस्त्यालगत राहणाऱया रहिवाशांना श्वसनाच्या व्याधी जडल्या आहेत.
अनेक डोंगर, वळणे असल्याने या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याचे कारण नेहमीच जनतेला पुढे केले जाते, पण स्वतंत्र भारतामध्ये याच कोकणातून दक्षिण भारताला जोडणारा कोकण रेल्वे प्रकल्प मुदतीच्या आत पूर्ण झाला. हा प्रकल्प साकार होत असताना यापेक्षाही कित्येक पटीने अधिक आव्हाने समोर होती, परंतु मुदतीपूर्वी पूर्ण झाला. हे करताना भांडवले ही पूर्णतः भारतीय होती. हे आदर्श उदाहरण समोर असताना या रस्त्याला ग्रहण का लागले आहे, असा प्रश्न सध्या जनता विचारत आहे.
केंद्र व राज्य शासन डोळे उघडेल काय?
संगमेश्वर तालुक्यातील आरवलीपासून चिपळूणपर्यंत अनेक भेगा, शिगा बाहेर आल्या आहेत. खेरशेत येथे रस्ता उखाडला आहे. कामथे घाटात मोठय़ा भेगा व खड्डे पडले आहेत. असुर्डे येथे खड्डे, तर असुर्डे खिंडीच्या पलीकडे चिपळूणकडे जाताना चक्क शिगाच रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्याचा पृष्ठभागदेखील खाली-वर असल्यामुळे गाडी चालवताना त्रास होत आहे. या एकूणच भीषण परिस्थितीकडे केंद्र व राज्य शासन लक्ष देणार का, हाच प्रश्न आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची रखडपट्टी झाली आहे. त्यावरून प्रवाशी आणि नागरिक सरकारविरोधात तीक्र संताप व्यक्त करत आहेत.






























































